महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांच्या संकल्पनेतून उपक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील डॉ. राजेंद्र प्रसाद गणेश उत्सव मंडळाच्या वतीने 'श्री गणेशा आरोग्याचा' या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ८१ रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी आप्पा उर्फ सुधीर शिवणे उपस्थित होते, तर नगरसेविका प्रा. क्रांती शिवणे यांची विशेष उपस्थिती लाभली. सौ. लता साळोखे यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थित नागरिकांचे स्वागत केले.
प्रास्ताविक करताना समन्वयक वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री सचिन कोगनोळे यांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सविस्तर माहिती दिली. सर्वसामान्य व गरजू रुग्णांपर्यंत या योजनेचा लाभ कसा पोहोचवता येईल, याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या शिबिरादरम्यान आरोग्य यंत्रणेतील डॉ. प्रतिक्षा आपटे व डॉ. संयुक्त भोसले यांनी रुग्णांना औषध वितरण केले. तसेच आदिती वंजारे, निखिल कांबळे आणि प्रथमेश मोहिते यांनी विशेष सहकार्य केले.
शिबिरामध्ये मंडळाचे सदस्य व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये शिवाजी देवेकर, अभिजित घेवडे, भानुदास सुतार, नितेश सुतार, नितीन साळोखे, संदीप घेवडे, संजय घेवडे, पवन दंडगे, निरंजन साळोखे, राहुल शिंदे, श्रीनिवास फडणीस, हेमंत सुतार, ओमजीत शिवणे, शंकर घेवडे, शशिकांत खोत, अशोक जोशी, विश्वनाथ पन्हाळकर, हर्षल शिवणे, विशाल शिवणे, विनायक घेवडे, अथर्व हावळ, रिया साळुंखे, सुमन साळुंखे, नंदा शिवणे, सोनाबाई शिवणे, लक्ष्मीबाई शिवणे, सुशीला देवेकर, सुशिला घेवडे, ज्योती घेवडे, सुनिता साळोखे, लता साळोखे, आदिती साळोखे, प्रीती साळोखे, सुमन साळोखे, सुरेखा शिवणे, मंदार शिवणे, शर्मिला शिवणे, तनिष्का शिवणे, सुकन्या शिवणे, समृद्धी देवेकर, दत्ता देवेकर, हर्षद देवेकर, अनिल देवेकर, तानाजी देवेकर, नाथाजी रेगडे आणि विष्णू शिवणे आदींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या या सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमाचे गडहिंग्लज शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेविका प्रा. क्रांती शिवणे यांनी उपस्थित डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले.



