Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अखेर उत्तूर बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम सुरू होणार; एसटी महामंडळाचे आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र


                                       आंदोलनाचे संग्रहित छायाचित्र 

आजरा (प्रतिनिधी): दीर्घ काळापासून रखडलेल्या उत्तूर बसस्थानकाच्या बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. बसस्थानकाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करण्यात येत असल्याचे अधिकृत व लेखी पत्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) विभाग नियंत्रक श्रीमती वृषाली भोसले यांनी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवाजी गुरव आणि आंदोलनाचा इशारा देणारे उत्तूर ग्रामपंचायतीचे सदस्य संभाजी कुराडे यांना दिले आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे उत्तूर परिसर आणि प्रवाशांमधून तीव्र समाधान व्यक्त होत आहे.


लोकभावनेचा आणि लढ्याचा विजय


उत्तूरला बसस्थानका आभावी प्रवासी, महिला आणि अबालवृद्धांना मोठी कसरत करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर कॉ. शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली प्रवासी संघटनेने, लोकप्रतिनिधींनी आणि ग्रामस्थांनी सातत्याने आवाज उठवला होता. उत्तूरच्या ग्रामसभेतही बसस्थानकाचे काम तात्काळ सुरू करण्याबाबत एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला होता. स्थानिक नागरिक आणि परिसरातील प्रवाशांनी या लढ्याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.


मंत्रालयीन पातळीवर सकारात्मक चर्चा


काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीत बसस्थानकाच्या प्रश्नावर सविस्तर व सकारात्मक चर्चा होऊन तात्काळ मार्ग काढण्याचे निर्देश देण्यात आले होते.


प्रशासकीय हालचाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात


मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनंतर एसटी महामंडळाची सकारात्मक भूमिका आणि उत्तूर ग्रामपंचायतीने दर्शवलेला योग्य प्रतिसाद यामुळे प्रशासकीय अडचणी दूर झाल्या आहेत. विभाग नियंत्रक श्रीमती वृषाली भोसले यांनी प्रत्यक्ष बांधकाम सुरू करत असल्याचे लेखी पत्र दिल्याने आता प्रत्यक्ष प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.


सर्वसामान्य प्रवासी, ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळेच हा लढा यशस्वी झाला असून, लवकरच उत्तूरकरांना बसस्थानक सेवेत दाखल होईल, असा विश्वास या वेळी कॉ. शिवाजी गुरव यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.