Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुढील दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात येणार!

शेतकऱ्यांना पीक विमा, कर्जमुक्तीसह शासनच्या योजनांचा लाभ प्राधान्याने देणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे




शिर्डी: दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, पीक विमा, कर्जमुक्ती तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात पुढील दोन तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात येणार आहे. अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.



संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे शेतकरी सोपान चकोर यांच्या शेताच्या बांधावर जाऊन कृषीमंत्री भरणे यांनी नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून पावसाचा खंड, पिकांची अवस्था आणि शेतीसमोरील अडचणी जाणून घेतल्या. पिंपळे गावातील काही शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत येत असलेल्या अडचणींची तातडीने दखल घेत कृषी व महसूल विभागाने चालू खरीप हंगामात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.


अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. सोयाबीनची ११३.०३ टक्के, कपाशीची ९१.६६ टक्के, मक्याची १६३.३४ टक्के, तुरीची १३४.३२ टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून पाण्याच्या ताणामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.


या पार्श्वभूमिवर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोकण, पुणे महसूल विभागातील पिकं, पाणी आढावा घेतल्यानंतर कृषीमंत्री नाशिक महसूल विभागाच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक विभगातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची उभी पिके अडचणीत आली असून, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. शेतीसोबतच पशुपालन, चारा आणि पाणीटंचाईवरही तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन विभागामार्फत सर्वसमावेशक अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



“मी स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या वेदना मला माहिती आहेत. या संकटात शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी असून, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली शासनाची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहोत,” असे भरणे यांनी सांगितले.


यावेळी आमदार अमोल खताळ, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासह कृषी, महसूल, महावितरण व ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.