Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कळविकट्टे येथे गणेशोत्सवात बालकांच्या वक्तृत्वाने जिंकली उपस्थितांची मने; क्रांतीवीर मंडळाच्या संयुक्त उपक्रमाला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद!



गडहिंग्लज (प्रतिनिधी): कळविकट्टे  येथे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत 'क्रांतीवीर गणेशोत्सव मंडळ' यांच्या वतीने काल (दिनांक १७) चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. आपल्या मुलांचे वक्तृत्व आणि स्टेजवरील आत्मविश्वासाचे क्षण त्यांच्या आई-वडिलांना प्रत्यक्ष अनुभवता यावेत, या उदात्त हेतूने हा संयुक्त सोहळा आयोजित केला होता.



या स्पर्धेमध्ये लहान मुला-मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत मांडला. अनेक चिमुकल्यांनी शिवरायांच्या पराक्रमाचे दाखले देत उपस्थितांची टाळ्यांच्या गजरात दाद मिळवली. तर काही बालकांनी स्पष्ट आणि सुश्राव्य उच्चारात श्लोक पठण करून संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि चैतन्यमय करून सोडले.


या प्रसंगी आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडताना पाहून उपस्थित पालकांच्या आणि विशेषतः मातांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान ओसंडून वाहत होता.




मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन उत्तमरीत्या केले होते. कळविकट्टे येथील ग्रामस्थांनी क्रांतीवीर गणेशोत्सव मंडळाच्या या कौतुकास्पद आणि समाजोपयोगी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून अशा उपक्रमांमुळे बालकांमध्ये वक्तृत्व गुण आणि सांस्कृतिक मूल्ये रुजण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.