ठाकरे शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील मळवीवाडी येथील तब्बल १२ एकर शासकीय जमिनीची बनावट कागदपत्रे व बेकायदेशीर आदेश तयार करून तिची परस्पर विक्री केल्याचा एक अत्यंत संतापजनक व गंभीर गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यकासह इतर दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संपूर्ण प्रकरणाची 'एसआयटी' मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार व कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पोलीस तपासात व प्राप्त माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेतील महसूल सहाय्यक राजेंद्र माळी, तातोबा गावडा आणि महेश बसापुरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. महसूल सहाय्यक राजेंद्र माळी याच्यासह या रॅकेटमध्ये सामील असलेल्या सर्व संशयितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, मळवीवाडी येथील १२ एकर जमिनीचा झालेला सर्व बेकायदेशीर व्यवहार रद्द करून ती जमीन प्रत्यक्षपणे शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी, डिजिटल साईनचा गैरवापर कसा झाला आणि यात महसूल विभागातील आणखी कोण सामील आहेत का, याची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे, संशयितांनी पत्रकारितेच्या किंवा शासकीय ओळखीचा गैरवापर करून जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित इतर कोणत्या जमिनींचे किंवा कामांचे बनावट आदेश तयार केले आहेत का, याची व्यापक चौकशी व्हावी. आदी मागण्या या निवेदनातून केल्या आहेत.

