![]() |
| कोल्हापूर : उमेदवारी अर्ज दाखल करताना ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे. यावेळी उपस्थित उपनेते संजय पवार. |
कोल्हापूर : 'गोकुळ' अर्थात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीची पहिली पायरी पार पडली आहे. २५ संचालक पदांच्या जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत ३०१ उमेदवारांनी तब्बल ४३६ अर्ज दाखल केले असून, यामुळे राजकीय ईर्ष्येला उधाण आले आहे.
रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये पार पडलेल्या अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रियेच्या अखेरच्या दिवशी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. मंगळवारी एकाच दिवसात ८२ उमेदवारांनी ११५ उमेदवारी अर्ज सादर केले. अर्ज भरणाऱ्या दिग्गजांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, माजी सदस्य अरुण इंगवले, गोकुळचे माजी संचालक मुरलीधर जाधव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जयवंत शिंपी यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांचा समावेश आहे.
आज अर्जांची छाननी; निर्णय अधिकाऱ्यांचे लक्ष
दरम्यान, दाखल झालेल्या सर्व ४३६ अर्जांची छाननी आज, बुधवारी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही छाननी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कोणकोणते अर्ज वैध ठरतात, याकडे सर्वच गटांचे बारीक लक्ष लागून राहिले आहे.
८ ऑक्टोबरनंतरच चित्र स्पष्ट होणार
छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राजकीय हालचाली, समझोते आणि माघारीच्या सत्रानंतरच गोकुळच्या रिंगणात प्रत्यक्षात किती उमेदवार उतरणार आणि कुणाची कुणाशी थेट लढत होणार, याचे अंतिम चित्र ८ ऑक्टोबरलाच स्पष्ट होणार आहे.

