कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न
आजरा (हसन तकीलदार): तालुक्यातील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व होम-हवन सोहळा कारखान्याचे संचालक शिवाजी तुकाराम नांदवडेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुजाता नांदवडेकर यांच्या शुभहस्ते, तसेच चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व्हाईस चेअरमन अनिल फडके यांनी केले. ऑफ-सिझन कालावधीत कारखान्यात झालेल्या दुरुस्ती व ओव्हरहोलिंगच्या कामांचा आढावा त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात घेतला.
४ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट
कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह देसाई यांनी आगामी हंगामाची रूपरेषा स्पष्ट करताना सांगितले की, यंदाच्या गळीत हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी परजिल्ह्यातील व स्थानिक मिळून एकूण ३६० तोडणी-वाहतूक कंत्राटदारांशी करार पूर्ण झाले असून त्यांना अॅडव्हान्स वाटपही करण्यात आले आहे. आजरा, गडहिंग्लज व चंदगड परिसरातील ऊस नोंदीचे काम पूर्ण झाले असून शेती खात्यामार्फत कार्य क्षेत्रातील ऊस प्राधान्याने आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दिवाळी बोनसची परंपरा पुनरुज्जीवित
पुढे बोलताना चेअरमन देसाई म्हणाले की, १९९७-९८ पासून सुरू असलेला हा कारखाना जुना झाला असल्याने नामदार हसन मुश्रीफ व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्यातून यावर्षी क्षमतेनुसार सक्षम ओव्हरहोलिंग करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी ही कामे वेळेत पूर्ण केल्यामुळे कारखाना गळीतासाठी पूर्णपणे सज्ज आहे. गेल्या ४-५ वर्षांपासून खंडित झालेली दिवाळी बोनसची परंपरा मोडीत काढून कर्मचाऱ्यांच्या त्यागाची दखल घेत यंदा त्यांना ८.३३ टक्के दिवाळी बोनस देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी या वेळी केली. शासनाने ठरवून दिलेल्या तारखेनुसार हंगामाचा शुभारंभ करून कारखाना वेळेत सुरू केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यास ज्येष्ठ संचालक वसंतराव धुरे, उदयसिंह पोवार, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, संचालक मधुकर देसाई, सुभाष देसाई, दीपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनीषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, हरिभाऊ कांबळे, तज्ज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई तसेच कार्यकारी संचालक एस. के. सावंत, जनरल मॅनेजर (टेक्निकल) एम. आर. पाटील, चीफ अकाउंटंट प्रकाश चव्हाण, चीफ केमिस्ट सुजय पाटील, मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई, कार्यालय अधीक्षक अनिल देसाई, एच. आर. मॅनेजर सुभाष भादवणकर, सिव्हिल इंजिनिअर शंकर आजगेकर यांच्यासह विविध अधिकारी, कामगार संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संचालक शिवाजी नांदवडेकर यांनी मानले.


