Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखर दरवाढीचा लाभ ऊस उत्पादकांना द्या; अन्यथा १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने बंद पाडू!

ठाकरे शिवसेनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन


प्रतिटन ३०० रुपयांचा वाढीव हप्ता देण्याची मागणी




गडहिंग्लज (प्रतिनिधी): सध्या बाजारात साखरेच्या दराने उच्चांक गाठला असून साखर कारखान्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. त्यामुळे या दरवाढीचा थेट लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे. मागील २०२५-२६ च्या हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन ३०० रुपयांचा वाढीव हप्ता (दुसरा हप्ता) तातडीने अदा करावा. आगामी सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना हा दिलासा न मिळाल्यास १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन हंगामातील ऊस वाहतूक रोखून साखर कारखान्यांचे गाळप पूर्णपणे बंद पाडू, असा थेट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन शिवसेना पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.


साखरेला उच्चांकी दर, मग शेतकऱ्यांनाच का तुटपुंजा भाव?


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कारखान्यांनी २०२५-२६ च्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन ३,००० ते ३,५०० रुपयांपर्यंत दर दिला होता. त्यावेळी साखरेचे दर ३,५०० ते ३,६०० रुपये प्रतिक्विंटल इतके होते. उपपदार्थ आणि साखरेच्या विक्रीचा ताळमेळ घालून दिलेला तो दर त्यावेळेनुसार योग्य होता. मात्र, सद्यस्थितीत बाजारपेठेत साखरेच्या भावात मोठी वाढ झाली आहे. कारखान्यांनी तब्बल ७० रुपये प्रति किलो या दराने साखरेची विक्री केली असून किरकोळ बाजारात साखरेचा भाव ७६ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. कारखान्यांना साखरेचे दुप्पट भाव मिळाल्याने त्यांना मोठा नफा झाला आहे. त्यामुळे या नफ्यातील वाजवी हिस्सा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणे क्रमप्राप्त आहे.


महागाई आणि दुष्काळी छायेत शेतकऱ्यांना आर्थिक आधाराची गरज


सध्या बाजारात रासायनिक खते, बियाणे आणि शेती अवजारांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच यंदा अनेक भागांत अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. समोर सणासुदीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांचा सण गोड करण्यासाठी कारखान्यांनी प्रतिटन किमान ३०० रुपयांचा वाढीव हप्ता तात्काळ जाहीर करावा, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून साखर कारखान्यांना त्वरित आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी ठाकरे शिवसेनेने केली आहे.


अन्यथा १५ ऑक्टोबरपासून ऊस वाहतूक रोखणार!


मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी गाळप हंगामात ऊस वाहतूक पूर्णपणे रोखून धरली जाईल आणि कारखान्यांचे चाक फिरू दिले जाणार नाही. होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी प्रशासन व कारखाना प्रशासनाची राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.



यावेळी सहकारसेना जिल्हासंघटक श्रीशैलाप्पा साखरे, चंदगड विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर, तालुकाप्रमुख अजित खोत, युवराज पोवार, गणेश बागडी, शहरप्रमुख प्रकाश रावळ, महिला विधानसभा संघटक सौ. अनिता पाटील, शेतकरी सेना तालुका संघटक सुभाष चव्हाण, तालुका संघटक संजय येसादे, माजी तालुकाप्रमुख विलास येमाटे, संजय पाटील, उपतालुकाप्रमुख सुधाकर जगताप, वसंत नाईक, ग्राहक संरक्षण तालुका संघटक मदन शिंदे, विभागप्रमुख दिगंबर पाटील, उपशहरप्रमुख शैलेश इंगवले तसेच महेश भोसले, विशाल चव्हाण, संभाजी येडूरकर, तुकाराम वाघराळकर, अरूण कोकीतकर, मारुती जाधव, उदय मंडलीक यांच्यासह अनेक शिवसैनिक व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.