Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बापाच्या त्यागाला लेकीची हीच ती पावती... सुवर्ण स्वप्नांची रौप्य पदकाने केली पूर्ती!

पैशांअभावी मुलीचे स्वप्न अपुरे राहू नये म्हणून विकले जमीन व दुकान गाळा 


गारगोटीच्या लेकीने आशियाई स्पर्धेत 'रौप्य' पटकावत फेडले बापाचे पांग!




गडहिंग्लज (संतोष नाईक): मुलीच्या स्वप्नांच्या आड गरिबी किंवा पैशांची चणचण कधीही येऊ नये, हाच एक ध्यास मनात ठेवून ज्या बापाने आपल्या हातातील शेवटची वडिलोपार्जित साडेदहा गुंठे जमीन आणि स्वतःचा दुकान गाळा विकला, त्या बापाच्या त्यागाचे आज चीज झाले! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि अनंत अडचणींचा सामना करत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी (पुष्पनगर) येथील २३ वर्षीय कन्या सोनम उत्तम मस्कर हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक पटकावून भारताचा तिरंगा जगभरात अभिमानाने फडकावला आहे.


अनपेक्षित प्रवासातून सुरू झालेला 'नेमबाज' होण्याचा प्रवास


सोनमचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. उत्तम मस्कर हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबईत दुधाचा व्यवसाय करत होते. पत्नी सुमन यांच्या साथीने मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी ते मुंबईत कष्ट उपसत होते. सोनमला लहानपणापासून बुद्धिबळ या खेळाची आवड होती. मात्र, अंधेरी येथील तोलाने कॉलेजमध्ये ११ वीत प्रवेश घेतल्यानंतर तेथे बुद्धिबळ हा खेळ उपलब्ध नव्हता. मनात इच्छा नसतानाही पर्याय नाही म्हणून सोनमने 'रायफल शूटिंग' हा खेळ निवडला. परंतु, एकदा हातात रायफल धरल्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. प्रशिक्षक निसार सर व किरण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या चार महिन्यांत तिने राज्यस्तरापर्यंत मजल मारली आणि याच खेळात करिअर करण्याचा पक्का निर्धार केला.


कोरोनाचे संकट अन् मुंबईहून 'पुन्हा' गावाकडे..


सोनमची ही यशस्वी घोडदौड सुरू असतानाच २०२० मध्ये कोरोनाचे भीषण संकट आले. लॉकडाऊनमुळे मुंबईतील दुधाचा व्यवसाय ठप्प झाला आणि मस्कर कुटुंबावर संकट कोसळले. नाईलाजाने कुटुंबाला आपल्या मूळ गावी, गारगोटीला परतावे लागले. गावी आल्यावर बहीण मानसी आणि भाऊ सत्यजित यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते, मात्र सोनमच्या खेळाचे काय? ही चिंता तिला सतावत होती. आपल्या लेकीची ही तगमग बापाने ओळखली अन् त्यांनी तिचे पुढील प्रशिक्षण कोल्हापूर येथील 'वेध अकॅडमी'मध्ये सुरू केले.


बापाचा महान त्याग: साडेदहा गुंठे जमीन अन् दुकान गाळा विकला!


रायफल शूटिंग हा अत्यंत खर्चिक खेळ. रायफल, गोळ्या आणि दैनंदिन प्रशिक्षणाचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा. गावी आल्यावर उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना केवळ मुलीचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून वडील उत्तम मस्कर यांनी आपली वडिलोपार्जित साडेदहा गुंठे जमीन आणि गडहिंग्लज येथील स्वतःचा दुकान गाळा विकला. स्वतःची सगळी संपत्ती पणाला लावून त्यांनी मुलांचे शिक्षण आणि सोनमच्या शूटिंगचे स्वप्न जिवंत ठेवले. आज त्याच लेकीने आशियाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकून संपूर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. बापाच्या कष्टाचे, त्यागाचे आणि संघर्षाचे आज खऱ्या अर्थाने सोने झाले आहे.


"जमीन विकली पण मुलीचा विश्वास तुटू दिला नाही!" – वडिलांची भावूक प्रतिक्रिया


"मुंबईतील व्यवसाय बंद पडल्यानंतर हाताशी काहीच उरले नव्हते. शूटिंग हा अत्यंत महागडा खेळ आहे, पण माझ्या मुलीच्या डोळ्यांत मला देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द दिसत होती. ती जिद्द पैशांअभावी अपुरी राहू नये, म्हणूनच मी वडिलोपार्जित जमीन आणि दुकान गाळा विकण्याचा निर्णय घेतला. संपत्ती पुन्हा कमावता येईल, पण मुलांचे भविष्य आणि स्वप्न एकदा संपले की परत येत नाही. आज जेव्हा सोनमच्या गळ्यात पदकाची मोहोर उमटली आणि तिरंगा अभिमानाने उंचावला, तेव्हा माझे डोळे भरून आले. मी केलेल्या संघर्षाचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले."

उत्तम मारुती मस्कर

(सोनमचे वडील)


ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्याकडून पालकांचा सत्कार



सोनमच्या या ऐतिहासिक यशानंतर तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, सोनम ही ठाकरे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांची नात आहे. सोनमच्या या यशानंतर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी स्वतः मस्कर कुटुंबाची भेट घेऊन सोनमच्या आई सुमन व वडिल उत्तम यांचा यथोचित सत्कार केला. मुलांच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी या आई-वडिलांनी केलेल्या महान त्यागाचे व कष्टाचे प्रा. शिंत्रे यांनी मुक्तकंठाने कौतुक केले तसेच सोनमच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुकाप्रमुख कृष्णा डाकरे, अविनाश शिंदे यांच्या सह शिवसेनेचे इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.