नूलच्या मातीतून आंतरराष्ट्रीय हॉकीच्या मैदानावर झेप ; जागृती हायस्कूलमध्ये सत्कार
गडहिंग्लज (संपत सावंत) : खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून संयम, एकाग्रता, जिद्द आणि आत्मविश्वासाची सांगड घातल्यास कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. मनात प्रबळ इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण सरावाने कोणत्याही खेळात हमखास यश मिळविता येते असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय हॉकीपटू, गडहिंग्लजची सुवर्णकन्या सानिका माने हिने विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज संचलित जागृती हायस्कूलमध्ये सत्कार प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी होते.
स्वागत मुख्याध्यापक उमेश सावंत यांनी केले. आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य चीनला हरवून भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारी कु. सानिका माने हिचा यथोचित सन्मान गजेंद्र बंदी यांच्या हस्ते करण्यात आला. हॉकीपटू सानिका माने व प्रशालेची माजी नेमबाजपटू कु. सोनम मस्कर यांच्या जीवन प्रवासावर आधारित भित्तीपत्रिकेचे उद्घाटन कु. सानिका माने हिच्या हस्ते करण्यात आले. याची निर्मिती संपत सावंत, प्रवीण सावंत, दत्ता लोहार यांनी केली.
पुढे बोलताना सानिका म्हणाली,' हे यश केवळ माझे नसून माझं कुटुंब, प्रशिक्षक, शाळा, मुगळी, नूल व गडहिंग्लज करांचे असून त्यांचे प्रेम, पाठबळ आणि आशीर्वादाचे फलित असल्याचे सांगितले. प्रवीण सावंत यांनी तिचा प्रेरणादायी जीवन प्रवास उलगडून सांगितला. प्रशिक्षक रमेश चौगुले यांनी नुल हॉकी परंपरेचा आढावा घेतला. अध्यक्षीय मनोगतातून गजेंद्र बंदी यांनी सामान्य कुटुंबातून आलेल्या सानिकाने आपल्या कर्तुत्वाने एवढे मोठे यश मिळवूनही तिच्या वागण्या- बोलण्यात कोणताही बडेजाव नाही .यशाच्या शिखरावर पोहोचूनही जमिनीवर पाय घट्ट ठेवण्याचा तिचा साधेपणा प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
यावेळी उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी,वडील चंद्रकांत माने यासह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत सावंत यांनी तर आभार अनिल कांबळे यांनी मानले.



