नगरपालिकेला ठाकरे शिवसेनेचे निवेदन; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेले जीवघेणे खड्डे, ठीकठिकाणी उघड्यावर साचणारा कचरा आणि त्यामुळे वाढलेला भटक्या कुत्र्यांचा उच्छाद यांमुळे गडहिंग्लजकर नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्र. नगराध्यक्ष महेश सलवादे यांना निवेदन सादर करण्यात आले. या समस्यांची तातडीने दखल न घेतल्यास 'शिवसेना स्टाईल'ने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदर निवेदन तालुकाप्रमुख अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मागील काही दिवसांपासून गडहिंग्लज शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची चाळण झाली असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत असून विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालक व पादचाऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच शहरातील विविध भागांत नियमित कचरा उचलला जात नसल्याने उघड्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या कचऱ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ही भटकी कुत्री लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर धावून जात असून चावा घेण्याच्या घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून आवश्यक तेथे डांबरीकरण करण्यात यावे, उघड्यावरील कचरा नियमित उचलण्याची व्यवस्था करावी, कचरा साचणाऱ्या ठिकाणी स्वच्छता करून आवश्यक तेथे कचराकुंड्या उपलब्ध कराव्यात, नियमानुसार व मानवी पद्धतीने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षितता द्यावी, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी आणि त्वरित उपाययोजना अंमलात आणाव्यात आदी मागण्या या निवेदनातून केल्या आहेत.
नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नांवर तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र शिवसेना स्टाईल आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या निवेदनातून दिला आहे.
तालुकाप्रमुख अजित खोत, शहरप्रमुख प्रकाश रावळ, उपतालुका प्रमुख वसंत नाईक, सुरेश हेब्बाळे, शिव सहकार सेना जिल्हा अध्यक्ष शैल्लापा साखरे,तालुका संघटक संजय पाटील, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष शैलेश इंगवले, उपशहर प्रमुख मनीष हावळ, विलास यामाटे, संकेत रावण, विशाल चव्हाण, सुहास जाधव, संभाजी यद्दूरकर, तुकाराम वाघराळकर, मारुती चौगुले,अंकुश चौगुले व शिवसैनिक उपस्थित होते.

