Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमध्ये ५२१ लाभार्थ्यांना प्रशासनाचा 'थेट आधार'; 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' अभियानास उदंड प्रतिसाद!



गडहिंग्लज (प्रतिनिधी): ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती घटकांतील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा व दाखल्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी गडहिंग्लज तहसील कार्यालयातील महसूल भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांमार्फत एकूण ५२१ लाभार्थ्यांना दाखले व योजनांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले.


कार्यक्रमाचे उदघाटन गडहिंग्लज तालुक्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव  आप्पासाहेब धुळाज यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी अजय पवार, गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्यासह विविध विभागांचे तालुकाप्रमुख व अशासकीय सदस्य उपस्थित होते.


या शिबिरासाठी हसूरचंपू, वडरगे, हरळी बुद्रुक, मुत्नाळ, हडलगे आणि कौलगे परिसरातील वडर, बेरड, लमाण, धनगर व इतर विविध समाजातील नागरिक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विविध विभागांचे स्टॉल व आधार कॅम्प


नागरिकांची सोय व्हावी यासाठी महसूल भवनाच्या प्रांगणात विविध शासकीय विभागांचे माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच नागरिकांसाठी विशेष आधार कॅम्प देखील आयोजित करण्यात आला होता. एकाच छताखाली विविध दाखले व योजनांची प्रक्रिया पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


उद्घाटनप्रसंगी बोलताना सचिव आप्पासाहेब धुळाज यांनी गडहिंग्लज प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करून लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. समाजातल्या वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी अजय पवार व प्रांत एकनाथ काळबांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले तर उपस्थितांचे आभार कोल्हापूरच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सुनिता नेरलीकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.