गडहिंग्लजला रंगला ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): वय वाढणे ही आयुष्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे, मात्र मनाचे तारुण्य जपणे आपल्या हातात आहे. ज्येष्ठ नागरिकांनी संगीत, कला, हास्य, मैत्री आणि आनंदी सहवासात रमून आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांनी संगीतात रमावे आणि जीवन गाणे गातच जावे, असे प्रतिपादन प्रा. अमित कुलकर्णी यांनी 'तुम्ही, आम्ही आणि Gen Z' या कार्यक्रमात बोलताना केले.
युनिव्हर्सल फ्रेंड सर्कल, गडहिंग्लज यांच्या वतीने आयोजित आणि लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयलच्या निमंत्रणावरून आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात प्रा. कुलकर्णी बोलत होते.
प्रा. कुलकर्णी म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांकडे आयुष्यभराच्या अनुभवांची समृद्ध शिदोरी असते. हा अनुभव केवळ आठवणींत न ठेवता पुढील पिढीला दिशा देण्यासाठी वापरला पाहिजे. ज्येष्ठत्व म्हणजे निवृत्ती नव्हे, तर आयुष्याचा आनंद नव्या पद्धतीने जगण्याची संधी आहे. गाणे ऐकताना वय विसरले जाते, हासताना चिंता विसरली जाते आणि मित्रांच्या सहवासात आयुष्य पुन्हा तरुण होते,” असे सांगत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना छंद जोपासण्याचे, नियमित सामाजिक संपर्क ठेवण्याचे आणि सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्यक्ष संवाद आणि आपुलकीचे क्षण कमी होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठांनी एकत्र येऊन गप्पा, गाणी, विनोद, अनुभवकथन आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांत सहभागी व्हावे. त्यांच्या अनुभवातून तरुण पिढीने शिकावे आणि तरुणांच्या ऊर्जेतून ज्येष्ठांनी नवचैतन्य घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
“ज्येष्ठांनी भूतकाळाची शिदोरी जपावी, वर्तमानाचा आनंद घ्यावा आणि भविष्याच्या पिढीला संस्कारांची दिशा द्यावी. शरीराचे वय वाढले तरी मनाचे वय वाढू देऊ नका,” हा संदेश प्रा. कुलकर्णी यांनी दिला.
मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध गाणी, मनोरंजनात्मक उपक्रम, हास्य-विनोद आणि जुन्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी आनंद लुटला.
यावेळी युनिव्हर्सल फ्रेंड सर्कलचे आणि युनिव्हर्सल महिला संघ चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य, लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयलचे अध्यक्ष ला सुभाष चोथे आणि पदाधिकारी व,सदस्य तसेच मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी गडहिंग्लज येथे विरंगुळा केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी यावेळी प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांच्याकडे करण्यात आली.

