सुनील चौगुले स्मृती चषक शालेय फुटबॉल स्पर्धा
साधना हायस्कूल उपविजेता, अधिराज जाधव सर्वोत्कृष्ट
![]() |
| गडहिंग्लज : संजीवन विद्यालयाला करंडक देताना राजू खणगावे. सोबत साताप्पा ढंगी, रोहित चव्हाण, शक्ती चौगुले, अरुणा कोलते, विकास कोलते आदी. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): पंधरा वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय फुटबॉल स्पर्धेच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात पन्हाळ्याच्या संजीवन विदयालयाने स्थानिक साधना हायस्कूलला १-० असे नमवून विजेतेपद पटकाविले. संजीवन विद्यालयाचा अधिराज जाधव स्पर्धावीराचा मानकरी ठरला. पन्हाळ्याच्याच संजीवन पब्लिक स्कूलला तिसरा तर येथील विजयामाला शिंदे हायस्कूलला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत सुनिल चौगुले यांच्या स्मृतीपित्यर्थ एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर गेले दोन दिवस ही स्पर्धा झाली. कोल्हापूर, बेळगाव जिह्यातील १२ संघानी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेचे तिसरे वर्ष होते.
अंतिम सामन्यात पुर्वार्धात साधना हायस्कूलने दर्शन तरवाळ, समित पन्नोरी, गोलरक्षक कार्तिक चव्हाणच्या चिवट खेळाच्या जोरावर संजीवन विदयालयाला ०-० असे बरोबरीत रोखले. मात्र, उत्तरार्धात संजीवनच्या शुभंकर भाटेच्या पासवर अधिराज जाधवने सुरेख निर्णायक गोल करून बाजी मारली. यांनतर संजीवनचा गोलरक्षक वीर पाटीलने गोल जाळे अभेद्य ठेवत साधनाच्या सुरज पोवारचे बरोबरीचे प्रयत्न हाणून पाडले. दरम्यान, संजीवन पब्लिक स्कूलने विजयामाला शिंदे हायस्कूलला टायब्रेकरवर ४-३ असे हरवून तिसरा क्रमांक मिळविला.
नगरसेवक राजू खणगावे, सौ. अरुणा कोलते, निवृत्त पोलीस निरीक्षक साताप्पा ढंगी यांच्याहस्ते विजेते आणि उपविजेत्यांचा गौरव झाला. यावेळी नायब तहसीलदार विकास कोलते, युनायटेडचे संचालक शक्ती चौगुले, प्रशांत बाटे, रोहित चव्हाण, प्रशिक्षक अमित साळोखे, सुनिल कलाल, सौरभ जाधव, सौरभ पाटील, प्रवीण पोवार यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. स्पर्धा समन्वयक दत्ता चव्हाण यांचा सत्कार झाला. ऋषीकेश भोसले यांनी आभार मानले. दरम्यान, एम.आर. हायस्कुलचे नव्वदच्या दशकातील जेष्ट खेळाडू प्रकाश जाधव, काशिनाथ बंदी, प्रशिक्षक उदय पाटील (कोल्हापूर), अशोक निळपणकर, बी. बी. पाटील यांनी मैदानावर सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट
स्पर्धावीर – अधिराज जाधव (संजीवन विद्यालय)
गोलरक्षक- वीर पाटील (संजीवन विद्यालय)
बचावपटू- दर्शन तरवाळ (साधना)
मध्यरक्षक- अभिषेक सासने (शिंदे हायस्कूल)
आघाडीपटू – मानव पटेल ( संजीवन पब्लिक)


