Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या हातात झाडू!; गडहिंग्लज तहसील कार्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम

सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ ; महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हिरिरीने सहभाग 


स्वच्छ व सुंदर कार्यालयातून लोकसेवेचा संकल्प




गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज तहसील कार्यालय आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम अत्यंत उत्साहात पार पडली.

या मोहिमेत गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता करत कर्मचाऱ्यांसमोर वस्तुपाठ घालून दिला. आज गुरुवारी सकाळी ७.०० ते ८.३० या वेळेत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालय, सर्व मंडळ अधिकारी कार्यालये आणि ग्राम महसूल अधिकारी कार्यालयांमध्ये ही विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तहसीलदार शेळके स्वतः स्वच्छता करताना पाहून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नवा उत्साह संचारला होता. या मोहिमेत महसूल सहायक, सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, शिपाई व महसूल सेवक (कोतवाल) यांनी उत्स्फूर्तपणे वैयक्तिक सहभाग नोंदवला.


यावेळी कार्यालय परिसरातील वाढलेले गवत काढणे व कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कार्यालयीन दप्तरांचे वर्गीकरण करून ‘सहा गड्डा’ पद्धतीने दप्तराची सुटसुटीत मांडणी करणे,  कार्यालयातील जाळे-जळमटे, धूळ साफ करणे, अनावश्यक कागदपत्रे व निकामी साहित्याची टाकाऊतून सुटका करत योग्य विल्हेवाट लावणे.

'स्वच्छ व सुंदर कार्यालय हीच सेवेची खरी ओळख' नागरिकांना प्रशासकीय सेवा वेळेत व स्वच्छ वातावरणात मिळाव्यात यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. “स्वच्छ व सुंदर कार्यालय हीच महसूल सेवेची खरी ओळख आहे,” असा संदेश या प्रसंगी देण्यात आला. या मोहिमेचे छायाचित्रे व व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले असून संपूर्ण महसूल यंत्रणा या अभियानात सक्रियपणे सहभागी झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.