Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला दिवाळीत राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा; तीन लाखांची पारितोषिके, पाच राज्यांचा सहभाग

स्पर्धेचे यंदाचे एकविसावे वर्ष 




गडहिंग्लज (प्रतिनिधी):  येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत दीवाळी सुट्टीत राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. लोकवर्गणीतून १२ ते १८ नोव्हेंबर अखेर सात दिवस हे सामने होतील. यजमान महाराष्ट्रासह केरळ, गोवा, कर्नाटक, दिल्ली, पंजाब या राज्यातून संघाना आंमत्रित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी एकुण तीन लाख रुपयांची पारितोषिके आहेत. स्पर्धेचे यंदाचे एकविसावे वर्ष आहे. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा होतील.



गडहिंग्लजला दिवाळीत फुटबॉल स्पर्धांची अर्धशतकाची परंपरा आहे. सत्तरच्या दशकात अजित क्रीडा मंडळाने आंतरराज्य स्पर्धेची सुरवात केली. गेल्या दोन दशकापासून खंडीत झालेली हि परंपरा युनायटेडने लोकवर्गणीतून चिकाटीने जपली आहे. स्पर्धेतील विजेत्याला रोख एक लाख, उपविजेत्याला ७५ हजार, तिसरा ३०००० तर चौथ्या क्रमांकाला वीस हजार अशी एकुण तीन लाखांची पारितोषिके आहेत. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सहा खेळाडूंना वैयक्तिक बक्षि‍सांसह प्रत्येक सामन्यात सामनावीर आणि लढवय्या म्हणून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल अशी माहिती गडहिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष जगदिश पट्टणशेट्टी यांनी दिली.


अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या मान्यतेने हि स्पर्धा होईल. स्पर्धेत सहभागी संघाना प्रवास खर्चासह निवास आणि भोजनाची सोय केली जाणार आहे. स्पर्धा यशस्वी करणेसाठी विविध समित्यांची स्थापना बैठकीत करण्यात आली. स्पर्धेचे समन्वयक नितीन पाटील, सुरज कोंडूस्कर यांनी स्पर्धेचे अंदाजपत्रक सादर केले.


युनायटेडचे खजीनदार महादेव पाटील, सचिव दीपक कुपन्नावर, संचालक संभाजी शिवारे, प्रशांत दड्डीकर यांनी विविध सूचना मांडल्या. कार्यकारी समितीचे संदिप कांबळे, ओमकार जाधव, यासीन नदाफ, सौरभ जाधव, प्रनाम प्रसादी उपस्थित होते. ललित शिंदे यांनी आभार मानले.


साखळी स्पर्धेचे स्वरूप कायम


गतवर्षीपासून युनायटेड राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे स्वरुप बदलण्यात आले. पुर्वी बाद पध्दतीने होणा-या स्पर्धेमुळे चांगला संघ एखाद्या सामन्यात हरल्यास स्पर्धेतून बाद ठरायचा. त्यामुळे स्पर्धा अधिक दर्जेदार होऊन शौकीनांना चुरशीचे सामने पहायला मिळावेत म्हणून स्वरुप बदलण्यात आले. त्यामुळे पात्रता फेरीत जिंकलेल्या संघाना अव्वल संघाशी साखळीत लढण्याची संधी मिळणार आहे. बदललेल्या स्वरुपामुळे स्पर्धेचा खर्च २० टक्के वाढणार असून अधिकाधिक फुटबॉल प्रेमी दानशुराकडे मदतीसाठी पोहचण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.