शाहू विचार मंच व शिवसेना शाखेकडून सलग २३ वर्षे सामाजिक एकतेची परंपरा
सर्व तरुण मंडळांचा मानाचा विडा, शाल व गणरायाच्या मूर्तीने गौरव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सामाजिक सलोखा आणि गणेशोत्सवाचा उत्साह अधिक द्विगुणित करण्याच्या उद्देशाने सालाबादप्रमाणे यंदाही हसुरचंपू येथे 'श्री छत्रपती शाहू विचार मंच' व 'शिवसेना शाखा हसुरचंपू' यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य'पान-सुपारी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली २३ वर्षे अखंडितपणे सुरू असलेल्या या उपक्रमात गावातील सर्व गणेशोत्सव तरुण मंडळांचा मानाचा पान-विडा, शाल-श्रीफळ आणि श्री गणरायाची मनमोहक मूर्ती देऊन अत्यंत उत्साहात सत्कार करण्यात आला.
विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून हसुरचंपू गावात शाहू विचार मंच व शिवसेना शाखेच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाच्या या २३ व्या वर्षातही सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानित करून आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात व गुण्यागोविंदाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
या स्नेहमयी कार्यक्रमाला श्री छत्रपती शाहू विचार मंचाचे संस्थापक तथा गडहिंग्लज तालुका शिवसेना ओबीसी सेल प्रमुख मारुती कमते, अध्यक्ष शकील मुल्ला, शिवसेना शाखाप्रमुख चंद्रशेखर खवणे तसेच राजू गोट्रूरे, बिराप्पा हुकेरी, आप्पासाहेब शिपुरे, महादेव मस्ती, संभाजी येरुडकर, मनू गस्ती, सुभाष हेबुले, लगमना करणार, तानाजी संकपाळ, कल्लाप्पा हेबुले यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ, शिवसैनिक व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२३ वर्षांची ही प्रदीर्घ व अखंड परंपरा हसुरचंपू गावातील एकता आणि बंधुभाव टिकवून ठेवण्यास अत्यंत मदतशीर ठरली असून सर्व तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमाबद्दल शाहू विचार मंच व शिवसेना शाखेचे आभार मानले.




