Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पेंढारवाडीजवळ आयशर ट्रक नाल्याच्या पुलावरून खाली कोसळला; चालकाचा जागीच दुर्दैवी अंत



आजरा (हसन तकीलदार): आजरा-उत्तूर मार्गावरील पेंढारवाडी गावाजवळ आंबेओहळ नाल्याच्या धोकादायक पुलावर काल मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने एक भरधाव आयशर मालवाहतूक ट्रक रस्त्याशेजारील सखल भागात जाऊन थेट पलटी झाला. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने ट्रक चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवार दि. २७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक  उत्तूरहून आजऱ्याच्या दिशेने जात होता. आंबेओहळ नाल्याच्या पुलाजवळ पेंढारवाडी गावच्या हद्दीतील एका अवघड वळणावर चालकाला वेगाचा आणि रस्त्याच्या वळणाचा अंदाज आला नाही. चालक रामलखन गंगाराम जाधव (वय ४०, रा. निंबरगा कलबूर्गी, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) हे वाहन चालवत होते.  चालकाचा ताबा सुटला आणि गाडी खोल सखल भागात जाऊन पलटी झाली. या अपघातात रामलखन जाधव यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच प्राण गेला.


या दुर्घटनेबाबत पेंढारवाडीचे पोलीस पाटील सुभाष गुंडू आजगेकर (वय ४३) यांनी आजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल भदरगे यांनी या घटनेची फिर्याद नोंदवून घेतली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मकानदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


आंबेओहळ नाल्याच्या पुलाजवळ अत्यंत तीव्र उतार आणि धोकादायक वळण आहे. रात्रीच्या वेळी किंवा अनोळखी चालकांसाठी या वळणाचा अंदाज बांधणे अत्यंत कठीण जाते, ज्यामुळे येथे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत असतात. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन या भागातील तीव्र उतार व धोकादायक वळण कमी करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.