Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

‘गोड साखर'च्या प्रगतीचा गोडवा अधिक वाढवणार ; यंदा ४.५ लाख मे. टन गाळपाचे लक्ष्य!

वार्षिक सभेत चेअरमन प्रकाशभाई पताडे यांची ग्वाही


शेतकरी व कामगारांचे हित जपण्यास संचालक मंडळ कटिबद्ध




गडहिंग्लज (प्रतिनिधी): आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना लि., हरळी ची सन २०२५-२०२६ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज, शनिवारी (दि. २६) कारखाना स्थळावर अत्यंत उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात पार पडली. कारखान्याचे चेअरमन प्रकाशभाई पताडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.


सभेच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वार्षिक आढावा मांडताना चेअरमन प्रकाशभाई पताडे यांनी कारखान्याने गेल्या वर्षभरात साधलेली उत्तुंग प्रगती आणि आर्थिक शिस्त यावर प्रकाश टाकला. शेतकरी सभासद आणि कामगार हेच कारखान्याचे खरी ताकद आहेत. आगामी काळात शेतकरी व कामगारांच्या हिताच्या नवनवीन योजना प्रभावीपणे राबवून कारखान्याला अधिक प्रगतीपथावर नेऊ असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच येत्या गळीत हंगामासाठी साडेचार लाख मेट्रिक टन गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली.


या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यान्नावर यांनी मनोगत व्यक्त केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर व नफा मिळवून देण्यासाठी चेअरमन आणि संचालक मंडळाने सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.


सभेला कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण, संग्रामसिंह कुपेकर, संतोष पाटील, शिवशंकर हत्तरगी, सतीश पाटील यांच्यासह सर्व सन्माननीय संचालक, कामगार आणि सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे संचालक बाबासो चौगुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.