देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीचा स्तुत्य उपक्रम; दर्शनासाठी विशेष सोय
गडहिंग्लज (प्रतिनिधी): इंचनाळ येथील प्राचीन आणि जागृत गणपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आता अधिक सहज आणि सोपा होणार आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी गडहिंग्लज ते इंचनाळ आणि इंचनाळ ते गडहिंग्लज या मार्गावरील एसटी बस प्रवासाची मोफत सेवा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडहिंग्लज आगाराचे प्रमुख संकेत जोशी यांच्या सहकार्याने देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
इंचनाळ येथील श्री गणपती मंदिर हे परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अंगारकी संकष्टीनिमित्त येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेऊन भाविकांना वाहतुकीची उत्तम सोय उपलब्ध व्हावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने 'देवस्थान स्थानिक सल्लागार उप समिती, मौजे श्री क्षेत्र इंचनाळ' यांच्यावतीने या मोफत एसटी प्रवासाचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष उपक्रमामुळे गडहिंग्लज आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व भाविकांना थेट मंदिरापर्यंत सुरक्षित व मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. या सुविधेचा सर्व भाविकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घ्यावा, असे आवाहन 'देवस्थान स्थानिक सल्लागार उप समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

