पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
कोल्हापूर : गणेशोत्सव सणासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमाणी आपल्या घराकडे येतात. मुंबईहून कोल्हापूर, आजरा, चंदगड, गारगोटी येथे येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कोल्हापूर शहर व जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तींची आर्थिक लुटमार होऊ नये, यासाठी परिवहन महामंडळ व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी त्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, असे निर्देश दिले. तसेच कोकणच्या धर्तीवर चाकरमान्यांना कोल्हापूरला आपल्या गावी येण्यासाठी बसेसचे नियोजन करण्यात आल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात येणाऱ्या विविध भक्तगणांचा प्रवास सुखकर होण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, महानगरपालिकेतील गटनेते शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दरवर्षी मोठ्या प्रणामात चाकरमाणी आपआपल्या गावी सण साजरा करण्यासाठी येत असतात. कोकणच्या धर्तीवर यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व चाकरमाणींसाठी ही सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नुकतीच मुंबई येथे रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली असून अतिरिक्त रेल्वे सोडाव्यात अशी मागणी केल्याचे सांगून ते म्हणाले, खाजगी बसेसनी चाकरमान्यांना अनावश्यक आर्थिक त्रास देऊ नये, यासाठी मुंबई व कोल्हापूर येथील दोन्ही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अधिकाधिक बसेस सोडण्यासाठी सुद्धा परिवहन मंत्र्यांकडे मागणी केली होती त्याप्रमाणे ९४ बसेस त्यांनी सोडलेल्या आहेत. सर्व नागरिकांसाठी एसटी बसेस आणि वेळेत उपलब्ध होतील अशी व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

