Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'सीएसआर'च्या माध्यमातून चंदगड, आजरा व गडहिंग्लजचा कायापालट करणार: डॉ. युवराज येडूरे

महागावात भव्य शेतकरी मेळाव्यात मोफत कृषी साहित्य व आर.ओ. प्लांटचे वाटप


कार्बन क्रेडिट योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ३ ते ५ लाखांचे उत्पन्न मिळवून देणार


जनतेच्या कामांच्या पाठपुराव्यामुळेच विकासाचा निधी महागावात: विनायक उर्फ अप्पी पाटील




गडहिंग्लज (प्रतिनिधी): अत्यंत गरिबी आणि संघर्षातून माझा प्रवास झाला आहे. बालपणी आई-वडिलांचे वीटभट्टीवरील कष्ट आणि गोकुळ दूध संघात पिशव्या भरण्यापर्यंतचे जीवन मी जवळून अनुभवले आहे. त्यामुळेच गरिबीची जाणीव ठेवून 'सीएसआर' (CSR) निधीच्या माध्यमातून चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील तळागाळातील शेतकरी आणि गरजवंतांचे जीवन समृद्ध करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा निर्धार महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. युवराज येडूरे यांनी व्यक्त केला.



महागाव येथे आयोजित भव्य शेतकरी मेळावा व साहित्य वाटप कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ आप्पी पाटील होते.


यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोफत कृषी फवारणी पंप, पॉवर वीडर आणि स्थानिक शाळांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या 'आर.ओ. प्लांट'चे वाटप करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तत्पूर्वी, पाच रस्त्यापासून छत्रपती शिवाजी चौकापर्यंत पारंपारिक वाद्यांच्या गजरात व सजवलेल्या बैलगाडीतून डॉ. येडूरे व मान्यवरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.



३ हजार पानांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करणार


डॉ. येडूरे पुढे म्हणाले, कंपन्यांच्या नफ्यातील २ टक्के सीएसआर निधी थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नव्हता. यासाठी सखोल अभ्यास करून ३ हजार पानांचा पारदर्शक प्राधिकरणाचा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे. या निधीतून तिन्ही तालुक्यांतील कल्याणकारी योजना अप्पी पाटील यांच्या माध्यमातून राबवल्या जातील. तसेच बांबू लागवड, वृक्षारोपण व बायोगॅसच्या माध्यमातून 'कार्बन क्रेडिट' संकल्पना राबवून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ३ ते ५ लाखांचे शाश्वत उत्पन्न मिळवून देण्याचा मानस आहे.


जनतेच्या कामासाठीच मी नेहमी बाहेर असतो : अप्पी पाटील


अध्यक्षीय भाषणात बोलताना विनायक पाटील यांनी विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, मी वैयक्तिक कामासाठी नव्हे, तर जनतेच्या विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी बाहेर असतो. मुंबईत माथाडी नेते प्रकाशराव पाटील यांच्याशी झालेल्या भेटीमुळेच डॉ. युवराज येडूरे यांच्याशी संपर्क आला आणि आज महागावात हा मोठा मदत मेळावा शक्य झाला. स्व. नामदार बाबासाहेब कुपेकर यांनी दाखवलेल्या समाजकारणाच्या विचारांवर चालून महागावच्या साथीने ही सीएसआर क्रांती संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवू.



कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांचा व मान्यवंचा सत्कार करण्यात आला. स्वागत अर्जुन दिवटे यांनी तर प्रास्ताविक सरपंच प्रशांत शिंदे यांनी केले. प्राचार्य डॉ. पी. डी. पाटील, विठ्ठलराव गडकरी भोसले, आय. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.



याप्रसंगी गोडसाखरचे संचालक सोमनाथ पाटील, दत्तराज पाटील, मनसे माथाडी संघटनेचे प्रकाश पाटील, राहुल पाटील, संभाजी नाईक, विजय खमललेट्टी, मुगळीचे सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश चौगुले यांनी केले तर आभार अप्पी पाटील युवा मंचचे अध्यक्ष श्रीशैल पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.