'पीजीआय' आणि चाचण्यांवर शिक्षकांचे मोठे मंथन
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मराठी विद्या मंदिर, तेरणी येथे हलकर्णी केंद्रस्तरीय सप्टेंबर महिन्याची शिक्षण परिषद अत्यंत उत्साही व अभ्यासपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या परिषदेत केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्यासोबतच 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स' (PGI), नियतकालिक चाचण्यांचे विश्लेषण आणि शैक्षणिक ग्रामसभेच्या प्रभावी अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रमजान अंकली यांनी उपस्थितांचे स्वागत करून परिषदेच्या उद्देशांबाबत प्रास्ताविक केले. त्यानंतर मुख्याध्यापक ईस्माईल कादरभाई यांनी विशेष शैक्षणिक ग्रामसभेचे आयोजन आणि त्याचे गावाच्या शैक्षणिक प्रगतीतील महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. दिपाली कांबळे यांनी शाळांच्या कामगिरीचे मोजमाप करणाऱ्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) प्रणालीची माहिती दिली. तसेच नुकत्याच पार पडलेल्या नियतकालिक चाचण्यांच्या निकालांचे विश्लेषणात्मक सादरीकरण करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठीच्या विविध उपाययोजना मांडल्या.
या परिषदेला प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी बाळू प्रधान यांनी विशेष भेट देऊन उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. केंद्रप्रमुख मल्लिकार्जून यादगुडी यांनी केंद्रात राबवायच्या विविध नवनवीन शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत उपस्थित शिक्षकांना प्रशासकीय कामकाज व नियोजनाबाबत आवश्यक सूचना दिल्या. परिषदेतील मार्गदर्शन आणि चर्चेमुळे आगामी काळात केंद्रातील शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यास मदत होणार असल्याचा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत कल्लोळे यांनी तर उपस्थितांचे आभार संभाजी पाटील यांनी मानले. या शिक्षण परिषदेस केंद्रमुख्याध्यापिका वैशाली गुरव, विभाग प्रमुख रमेश पाटील यांच्यासह हलकर्णी केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.




