Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कुंचल्यातून आयुष्याला रंग देणारा कलावंत हरपला!

गडहिंग्लज येथील शशिकांत गुरव यांचे निधन 




गडहिंग्लज (संपत सावंत ): काही माणसं आयुष्यातून निघून जातात; पण त्यांच्या आठवणींचे रंग मनाच्या कॅनव्हासवर कायमचे उमटून राहतात. गडहिंग्लज येथील गुजर वसाहतीत राहणारे शशिकांत गुरव हे असेच एक संवेदनशील, शांत, संयमी, सुस्वभावी आणि प्रेमळ व्यक्तिमत्व होते. त्यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. एक गुणवंत कलावंत आणि जिव्हाळ्याचा माणूस हरपल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.



चित्रकलेची विलक्षण आवड असलेल्या शशिकांत यांनी मुंबईच्या सुप्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण घेतले आणि जी.डी. आर्टसची पदवी संपादन केली. ब्रश, रंग आणि कुंचल्यांशी नाते केवळ कलेपुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी आपल्या साध्या, सोशिक आयुष्यालाही या रंगाने सुंदर अर्थ दिला. 

त्यांच्यातील कलागुणांना मोठ्या व्यासपीठाची संधी मिळाली असती तर ते निश्चितच कलाक्षेत्रात मोठे नाव कमावू शकले असते; मात्र परिस्थितीने त्यांची पावले मुंबई, पुण्याच्या कलाक्षेत्रापर्यंत पोहोचू दिली नाहीत. गडहिंग्लजमध्येच त्यांनी छोटा- मोठा व्यवसाय करीत संसाराचा गाडा नेटाने हाकला. सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असे. गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातूनही त्यांनी आपले सामाजिक ऋण जपले. त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार त्यांच्या प्रेमळ स्वभावाची साक्ष देणारा होता. 



त्यांच्या पश्चात आई श्रीमती सुशीला, भाऊ विक्रांत, पत्नी आरती, भाऊजई क्रांती, मुलगी दिपाली, पुतणी श्वेता, पुतण्या संजीत असा परिवार असून ४ ऑक्टोंबर रोजी बारावा दिवस कार्य होत असून अशा या गुणी, संवेदनशील कलावंतांच्या स्मृतीना अश्रूपूर्ण नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.