Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दिवाळीला गतवर्षीच्या ऊसाला प्रतिटन १०० रुपये जादा फरक देणार : अध्यक्ष मुकुंद देसाई

आजरा साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात


कामगारांना ८.३३टक्के बोनस आणि सेवानिवृत्तांची देणी दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा




आजरा (प्रतिनिधी): वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साही वातावरणात पार पडली. कारखाना अडचणीच्या काळात असताना कामगार आणि सभासदांनी दिलेल्या त्यागामुळेच बंद पडलेले चाक पुन्हा फिरू शकले आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत, शेतकऱ्यांना दिवाळी गोड करण्यासाठी गतवर्षीच्या ऊसाला प्रतिटन १०० रुपये जादाचा फरक दिला जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी केली.


यावेळी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून नामदार हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने कारखान्याला १२२ कोटी रुपयांचे एन.सी.डी.सी. कर्ज मंजूर झाले आहे. कारखान्याला दरमहा भरणा करावा लागणारा ८८ लाख रुपयांचा व्याज हप्ता वेळेत भरला जात असून अहवाल सालात कारखान्याने २ कोटींहून अधिकची बचत केली आहे. कामगारांना पुढील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने १००% पगार पूर्ववत केला जाईल. तसेच यंदा दिवाळीला ८.३३% बोनस दिला जाणार असून, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दिवाळीपूर्वी भागवली जातील. जुनी मशिनरी बदलण्याचे धोरण आखण्यात आले असून शेती विभागात ७ ते ८ ऊसतोडणी मशीन उपलब्ध केल्या आहेत. व्ही.एस.आय. (VSI) पुणे यांच्या माध्यमातून उत्तूर सेंटर येथे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीचा प्रयोग सुरू आहे. आगामी २०२६-२७ गाळप हंगामात ४ लाख टनांहून अधिक गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.



यावेळी कारखान्याच्या पाच गटांतील व कार्यक्षेत्राबाहेरील सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकरी बागायदारांचा रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 


माजी चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे यांनी कारखान्यातील अनावश्यक खर्च टाळून ओव्हरहोलिंगचे काम बजेटमध्ये पूर्ण करण्याची सूचना केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई यांनी रिकव्हरीचा फटका बसू नये म्हणून १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरू घाईघाईने न करण्याचा सल्ला दिला. सुनील शिंदे आणि संजय देसाई यांनी निवृत्तांची देणी व ऊस बिले वेळेत देण्याबाबत व्यवस्थापनाचे लक्ष वेधले.



सभेचे स्वागत उपाध्यक्ष अनिल फडके यांनी तर श्रद्धांजलीचा ठराव संचालक रणजित देसाई यांनी मांडला. नोटीस वाचन कार्यकारी संचालक संभाजी पाटील यांनी तर मागील सभेचे इतिवृत्त वाचन अधीक्षक अनिल देसाई यांनी केले. सूत्रसंचालन एकनाथ गिलबिले यांनी केले व आभार संचालक राजेंद्र मुरुकटे यांनी मानले. 


या प्रसंगी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, उदयराज पोवार, सुभाष देसाई, मधुकर देसाई, संभाजी पाटील, मारुती घोरपडे, सौ. रचना होलम, सौ. मनीषा देसाई, माजी संचालक, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य तसेच मोठ्या संख्येने शेतकरी सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.