Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

५० वर्षे... ४२ वर्गमित्र आणि तोच जुना जिव्हाळा!

१९७५-७६ च्या दहावीच्या तुकडीचा जागृतीत स्नेहमेळावा 


गुरु-शिष्यांच्या भेटीने वातावरण भावूक




गडहिंग्लज (संपत सावंत) : आयुष्याच्या संध्याछाया गडद होत असताना पन्नास वर्षांपूर्वीच्या बालपणातील सोनेरी आठवणींना उजाळा देत जुन्या स्नेहबंधांना पुनश्च उजाळा देणारा एक अत्यंत भावूक आणि देखणा सोहळा गडहिंग्लज शहरात पार पडला. येथील जागृती प्रशालेच्या सन १९७५-७६ मधील इयत्ता दहावीतील तब्बल ४२ वर्गमित्रांनी एकत्र येत तब्बल पाच दशकांनंतर बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. या मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या विद्यार्थ्यांसोबत त्यांना घडवणारे तत्कालीन शिक्षकही याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहिल्याने संपूर्ण वातावरणात आनंदाश्रू आणि आदराची विशेष भावनिक रंगत उमटली.


संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कितुरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला. व्यासपीठावर संचालक इंजि. किशोर हंजी, डॉ. शिवकुमार कोल्हापुरे यांच्यासह माजी प्राचार्य आय. जी. फुटाणे, बी. बी. तराळ, ए. एस. चौगुले, काशिनाथ शेट्टी, विजय शेट्टी व जे. बी. केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी प्राचार्य आय. जी. फुटाणे म्हणाले, आज पन्नास वर्षांनंतर तुम्ही सर्वजण पुन्हा या शाळेच्या प्रांगणात आलात, हीच आमच्या शिक्षक म्हणून आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. तुमचे तेच निरागस हास्य आणि डोळ्यांतील आठवणी पाहून मन भरून आले. शिक्षकाचे विद्यार्थ्यांशी जोडलेले नाते कधीच संपत नाही, ते मनाच्या कोपऱ्यात सदैव जिवंत राहते. हा क्षण डोळ्यात अश्रू आणि मनात अनमोल समाधान देऊन आयुष्यभरासाठी स्मरणात राहील.


कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पाच दशकांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. शालेय जीवनातील गमती-जमती, शिक्षकांचे कडक पण तितकेच मायाळू मार्गदर्शन आणि त्या काळातील सोनेरी प्रसंगांना उजाळा देताना संपूर्ण परिसर कधी हास्य-विनोदाने तर कधी भावूक वातावरणाने व्यापून गेला होता.



पन्नास वर्षांचा प्रदीर्घ कालखंड मागे टाकून पुन्हा एकत्र आलेल्या या सवंगड्यांच्या भेटीने हा मेळावा प्रत्येकाच्या आयुष्यातील आठवणींचा अमूल्य ठेवा ठरला. कार्यक्रमाचे आभार दयानंद खन्ना यांनी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक उमेश सावंत, उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी व दत्ता लोहार यांनी विशेष सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.