तहसील कार्यालयामार्फत आयोजन; ५७ नागरिकांना दिलासा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): दीर्घकाळापासून प्रलंबित असणाऱ्या महसुली प्रकरणांचा जलद आणि सामंजस्याने निपटारा करण्यासाठी राबवण्यात आलेल्या 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान २०२६' अंतर्गत गडहिंग्लज तहसील कार्यालयाने मोलाची कामगिरी बजावली आहे. शनिवारी (१० ऑक्टोबर) आयोजित करण्यात आलेल्या महसूल लोक अदालतीत १० प्रलंबित प्रकरणे आपापसातील सामंजस्याने कायमस्वरूपी निकाली काढण्यात आली. ज्याचा थेट फायदा तालुक्यातील ५७ नागरिकांना झाला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर जिल्हाधिकारी अजय पवार आणि गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्या नियंत्रणाखाली येथील महसूल भवन येथे या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या लोक अदालतीचे उद्घाटन गडहिंग्लजचे जिल्हा सरकारी वकील ॲड. सुनील तेली, पोलीस निरीक्षक सतीश होडगर, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आर. आर. सूर्यवंशी, तहसीलदार ऋषिकेत शेळके आणि निवासी नायब तहसीलदार अब्दुल रौफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. सुनील तेली यांनी उपस्थितांना न्यायालयातील दीर्घकालीन लढ्यांपेक्षा तडजोडीचे आणि आपापसातील सामंजस्याचे काय महत्त्व असते हे पटवून दिले. तसेच पोलीस निरीक्षक, महावितरणचे अभियंता आणि तहसीलदार यांनीही नागरिकांना आपापसातील वाद मिटवून तडजोड करण्याचे आवाहन केले.
या लोक अदालतीमध्ये एकूण ३८ महसुली प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने कुळ कायद्यांतर्गत असणारे वाद, रस्त्यांचे वाद, शेतजमीन क्षेत्र दुरुस्ती, जमिनीच्या वाटपाचे वाद आदी प्रकरणांचा समावेश होता. या प्रकरणांमध्ये दोन्ही बाजूंच्या पक्षकारांनी सकारात्मक सहभाग नोंदवत १० गुंतागुंतीची प्रकरणे कायमस्वरूपी तडजोडीने सोडवली.
महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे विनासायास आणि जलदगतीने सुटावीत हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. लोक अदालतीमुळे पक्षकारांची न्यायालयात होणारी पायपीट थांबून त्यांचा वेळ, पैसा वाचला आणि मानसिक त्रासातून मोठी मुक्ती मिळाली अशी प्रतिक्रिया लाभार्थी नागरिकांनी दिली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गडहिंग्लज तहसील कार्यालयाचे सहाय्यक महसूल अधिकारी अभिजीत पवार, महसूल सहाय्यक सतीश आणेकर आणि राहुल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले. तर उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार अब्दुल रौफ शेख यांनी मानले.


