Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ऊसाला ५००० रुपये दर द्या, अन्यथा ऊस वाहतूक रोखणार!

ठाकरे शिवसेनेचे गडहिंग्लज साखर कारखान्याला निवेदन


मागील हंगामातील ३०० रुपयांचा वाढीव हप्ता आणि यंदा ५ हजार रुपये दराची मागणी




गडहिंग्लज (प्रतिनिधी): मागील गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३०० रुपयांचा वाढीव हप्ता त्वरित वर्ग करावा, तसेच सुरू होणाऱ्या यंदाच्या हंगामातील ऊसाला किमान ५,००० रुपये प्रतिटन दर जाहीर करावा. या मागण्या मान्य न झाल्यास कारखान्याची ऊस वाहतूक रोखून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. 


आज हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना या संदर्भातील  मागण्यांचे निवेदन तालुकाप्रमुख अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.


साखरेचे दर वाढले, मग शेतकऱ्यांना लाभ का नाही?

निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट असून शेतीमालाला योग्य हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये इथॅनॉलचा वापर सुरू केला आहे तसेच खुल्या बाजारात साखरेचे दर ५५ ते ६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. साखरेची दरवाढ आणि बाय-प्रॉडक्ट्स (उपपदार्थ) यामुळे साखर कारखानदारांना मोठा नफा मिळत आहे. त्यामुळे या वाढीव नफ्याचा थेट लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे.


दिवाळीपूर्वी निर्णयाची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा


१५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत आहे. त्यापूर्वी म्हणजेच दिवाळी सणाआधी कारखान्याने ऊस दरवाढीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा शिवसेनेच्या वतीने साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखून आक्रमक आंदोलन छेडले जाईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


निवेदन देताना शिवसेना गडहिंग्लज तालुकाप्रमुख अजित  खोत, युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, ग्राहक सेना जिल्हाध्यक्ष दिनेश कुंभीरकर, शिवसहकार सेना जिल्हाध्यक्ष शैल्लापा साखरे, सहकार सेना संघटक मारुती जाधव, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, उपतालुकाप्रमुख संजय पाटील, तालुका संघटक संजय पाटील, माजी तालुकाप्रमुख विलास यमाटे,  लक्ष्मन पाटील, तुकाराम वाघराळकर, संभाजी यदुरकर, तेजस घेवडे, सुमित कोरवी, अंकुश चौगुले यांच्यासह इतर शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.