बचत, विमा आणि आंतरराष्ट्रीय टपाल सेवांची ग्रामस्थांना सविस्तर माहिती; उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत भारतीय डाक विभागाच्या विविध जनकल्याणकारी योजना, आधुनिक बँकिंग सुविधा आणि आंतरराष्ट्रीय टपाल सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने नरेवाडी शाखा डाक कार्यालयात ‘डाक चौपाल’ कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेवाडीचे सरपंच अंकुश रणदिवे होते.
कार्यक्रमा दरम्यान पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना, जसे की आवर्ती ठेव योजना (RD), मुदत ठेव (TD), सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. याशिवाय डाक जीवन विमा (PLI), ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (IPPB) डिजिटल बँकिंग सेवांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे, परदेशात पत्रे व वस्तू पाठविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय टपाल बुकिंग सेवेची' (International Article Booking) माहिती यावेळी ग्रामस्थांना देण्यात आली.
मार्गदर्शन करताना डाक निरीक्षक गणेश चाटे म्हणाले, नागरिकांनी बचतीची सवय अंगी बाळगून विम्याच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करावे. तसेच डाक विभागाच्या आधुनिक आणि डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
अध्यक्षीय भाषणात सरपंच अंकुश रणदिवे यांनी टपाल खात्याच्या योजनांचे महत्त्व सांगत ग्रामस्थांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तर, माजी सरपंच सौ. चंदाबाई निलवे यांनी ग्रामीण भागात शासकीय योजना पोहोचवण्यासाठी अशा 'डाक चौपाल' उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
या प्रसंगी नरेवाडीचे पोस्टमास्तर राजेंद्र चुगडी, नौकूडचे पोस्टमास्तर ज्योतिबा मांगले, तेरणीचे पोस्टमास्तर करवीर नावलगी, बुगडीकट्टीचे पोस्टमास्तर मल्लिकार्जुन रामाज, कडलगेच्या पोस्टमास्तर कु. प्राची चौगुले, नंदनवाडच्या पोस्टमास्तर कु. साक्षी हजारे, तेरणीच्या सहाय्यक पोस्टमास्तर कु. साक्षी चव्हाण, तसेच प्रशांत पाटील, प्रवीण आळवणे, नरेवाडीचे पोस्टमन सौरभ पोवार आणि संतोष भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार तेरणीचे पोस्टमास्तर करवीर नावलगी यांनी मानले. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून ग्रामस्थांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


