Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हडलगेत चाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेला लुटणारा संशयित जेरबंद; २.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

संशयित कर्नाटकातील संतीबस्तवाड येथील ; कोल्हापूर एलसीबीची धडक कारवाई


                                                        काल्पनिक चित्र

गडहिंग्लज (प्रतिनिधी): हडलगे बंधाऱ्याजवळ जनावरे चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या मानेला चाकू लावून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या संशयिताच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी संशयिताकडून १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या अटकेमुळे नेसरी पोलीस ठाण्यातील जबरी चोरीसह पंढरपूर येथील मोटरसायकल चोरीचा अशा दोन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. बाळू लक्ष्मण कर्लेकर (वय ५०, रा. संतीबस्तवाड, ता. जि. बेळगाव, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.



दिनांक २८ सप्टेंबर रोजी दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास हडलगे गावातील पडिक जमिनीमध्ये फिर्यादी वृद्ध महिला जनावरे चारण्यासाठी गेली होती. यावेळी अचानक आलेल्या अनोळखी संशयिताने "ओरडलीस तर तुझा मर्डर करीन," अशी धमकी देत मानेला चाकू लावून तिचे सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि कानातील कर्णफुले असा १४ ग्रॅम सोन्याचा ऐवज जबरीने चोरून नेला. याप्रकरणी नेसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना समांतर तपासाचे आदेश दिले होते. तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास चक्रावली. दरम्यान, एलसीबीचे पोलीस अंमलदार अनिकेत मोरे, समीर कांबळे आणि सचिन जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा बाळू कर्लेकर याने केला असून तो हिटणी फाटा येथे येणार आहे.


जाळ्यात अडकला अन पंढरपूरचाही गुन्हा उघड!


मिळालेल्या माहितीनुसार ५ ऑक्टोबर २०२६ रोजी हिटणी फाटा येथे पोलिसांनी सापळा रचून बाळू कर्लेकर याला मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्याने विचारपूस केली असता त्याने नेसरीतील लुटमारीची कबुली दिली. अधिक तपासात त्याने वापरलेली मोटरसायकल ही पंढरपूर येथून चोरलेली असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याने लुटलेले सोन्याचे दागिने आणि चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला नेसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


ही यशस्वी कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक  अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


तपास पथकात पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सपोनि सागर वाघ, पोलीस अंमलदार समीर कांबळे, अनिकेत मोरे, सचिन जाधव, प्रविण पाटील, दीपक घोरपडे, वसंत पिंगळे, संजय हुंबे, सतीश सूर्यवंशी, सागर चौगले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.