Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सणोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा; नांगनूरच्या समता तरुण मंडळाकडून स्मशानभूमीत लोखंडी बाकड्यांचे लोकार्पण

स्मशानशेडमधील धोकादायक सिमेंट बाकड्यांऐवजी मजबूत लोखंडी बाकडी ; सामाजिक भान जपणार्‍या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक


नांगनूर: समता तरुण मंडळाच्या वतीने स्मशानशेडसाठी बसवण्यात आलेल्या लोखंडी बाकड्यांच्या लोकार्पण प्रसंगी आप्पासाहेब बिरंजे, माजी कॅप्टन रामकृष्ण शेंडे, वाय. एस. नार्वेकर, एस. बी. पाटील, बाळकृष्ण रावण व ग्रामस्थ.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): उत्सवाच्या काळात होणाऱ्या विनाकारण आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक प्रबोधनाचा आणि निस्वार्थ सेवेचा नवा आदर्श गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर येथील समता तरुण मंडळाने घालून दिला आहे. मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गावाबाहेरील स्मशानशेडमध्ये ग्रामस्थांच्या सुविधेसाठी मजबूत लोखंडी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली. या बाकड्यांचा लोकार्पण सोहळा आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब बिरंजे यांच्या हस्ते फित कापून अत्यंत साध्या वातावरणात पार पडला.


कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी कॅप्टन रामकृष्ण शेंडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की, गेल्या कित्येक दिवसांपासून स्मशानशेडमधील जुन्या सिमेंटच्या बाकड्यांची अत्यंत दुरवस्था झाली होती. ही बाकडी खचल्यामुळे त्यावर बसणे अयोग्य व धोकादायक झाले होते. एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन समता तरुण मंडळाने सामाजिक जाणिवेतून त्वरित ही नवीन आणि मजबूत लोखंडी बाकडी बसवण्याचा निर्णय घेतला.


समता तरुण मंडळाने केवळ उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित न राहता सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवून सुवर्ण महोत्सवी वर्ष सार्थ ठरवले आहे. स्मशानभूमीसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी ग्रामस्थांना बसण्यासाठी योग्य सोय करून मंडळाने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीची साक्ष दिली आहे. मंडळाच्या या कौतुकास्पद कार्याची संपूर्ण परिसरात आणि विविध स्तरांतून प्रशंसा केली जात आहे.



याप्रसंगी प्रल्हाद नार्वेकर, लक्ष्मण नार्वेकर, वाय. एस. नार्वेकर, दीपक पोरीवाडे, तानाजी पाटील, वसंत रावण, रवी बिरंजे, एस. बी. पाटील, बाळकृष्ण रावण, आप्पासाहेब जाधव, तानाजी नार्वेकर, सुखदेव मोकाशी, दीपक रावण, घोरपडे, विक्रांत नार्वेकर, आप्पासाहेब परीट यांच्यासह समता तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, 'सहयोग फाउंडेशन'चे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.