ठाकरे शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक उद्धव कदम यांचे आवाहन
गडहिंग्लजमधील आढावा बैठकीत शिवसैनिकांना संघटन वाढीचा मंत्र
८० टक्के समाजकारण आणि निष्ठा हीच आपली ताकद: संजय पवार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर विचारांतून आणि त्यागातून उभी राहिलेली शिवसेना ही केवळ एक राजकीय पक्ष नसून जनसेवेची चळवळ आहे. बाळासाहेबांचे हेच क्रांतिकारक विचार प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत आणि घराघरात पोहोचविण्याची खरी जबाबदारी ही तळागाळातील शिवसैनिकांची आहे. आगामी काळातील आव्हाने पेलण्यासाठी आणि पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी सर्व बूथ प्रमुखांनी व शाखाप्रमुखांनी आतापासूनच पूर्ण ताकदीने आणि जोमाने कामाला लागावे. ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ ही मोहीम प्रत्यक्ष तळागाळात राबवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात अधिक बळकट करावेत, असे आवाहन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पश्चिम महाराष्ट्र संघटक उद्धव कदम यांनी गडहिंग्लज येथे केले.
गडहिंग्लज येथे आयोजित चंदगड, राधानगरी, कागल विधानसभा मतदारसंघाच्या पायाभूत संघटनात्मक बांधणी व सर्वसमावेशक आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांचीप्रमुख उपस्थिती लाभली होती.
बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव कदम पुढे म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रत्येक नागरिकाच्या घराघरात व मनामनात पोहोचावा यासाठी पक्षाच्या धोरणानुसार एक हजार मतदारांमागे एका बूथ प्रमुखाची (BLA) नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व बूथ प्रमुखांनी, विभागप्रमुखांनी आणि शाखाप्रमुखांनी आपापल्या भागातील मतदार याद्यांची अत्यंत बारकाईने पाहणी व पडताळणी करणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य प्रशासनाकडून राबवल्या गेलेल्या मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेनंतर कोणत्या भागात नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, कुठे मतदारांची संख्या कमी झाली आहे किंवा कुठे तांत्रिक त्रुटी आहेत, याचा सविस्तर आणि अचूक आढावा प्रत्येकांनी घेतला पाहिजे. आगामी काळात या सर्व संघटनात्मक यंत्रणांनी अत्यंत शिस्तबद्धतेने, परस्पर समन्वयाने आणि एकजुटीने शिवसेना पक्षसंघटन वाढीसाठी मैदानावर उतरावे. पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करत शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे सांगतानाच त्यांनी उपस्थितांना एसआयआर मोहिमेच्या तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करून विविध सूचनाही केल्या.
शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हीच आदरणीय बाळासाहेबांनी दिलेली शिवसेनेची मूळ विचारधारा आहे. संकट कितीही मोठे असो, शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात धावून जात समाजकारणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. हेच विचार आणि हीच संस्कृती आम्ही आजपर्यंत जिद्दीने जपत आलो आहोत आणि पुढेही ही परंपरा अखंडितपणे सुरू राहील. शिवसेना हा केवळ एक पक्ष नसून माझ्यासाठी तो माझा श्वास आणि प्राण आहे. राजकीय प्रवासात कितीही वादळे आली तरी शेवटच्या श्वासापर्यंत मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीच पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पाठीशी उभा राहीन. निष्ठावंत शिवसैनिकांच्या अफाट मेहनतीच्या आणि त्यागाच्या बळावर पक्षाला लवकरच पुन्हा एकदा सुवर्णकाळ आणि गतवैभव प्राप्त होईल यात शंका नाही. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने आणि आत्मविश्वासाने कामाला लागावे.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात चंदगड, कागल, राधानगरी मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीची माहिती देऊन आगामी काळातील उपक्रमांची रूपरेषा मांडली.
या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस विधानसभा प्रमुख अशोक निकम, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, संपर्क संघटिका रंजना शिंत्रे, शुभांगी शिंदे, तालुकाप्रमुख अजित खोत, युवराज पवार, विष्णू गावडे, गणेश बागडी, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, जिल्हा संघटक शांताबाई जाधव, ग्राहक सेना जिल्हा संघटक दिनेश कुंभीरकर, शिव सहकार जिल्हाप्रमुख श्रीशैलप्पा साखरे यांच्यासह विविध उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख, बूथ प्रमुख (BLA) आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




