पाच ते सहा तालुक्यांचा भार असलेल्या गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था
मनसेने समस्यांकडे वेधले लक्ष; रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कर्नाटक, गोवा आणि कोकणच्या सीमेवर वसलेल्या व पाच ते सहा तालुक्यांतील गोरगरीब रुग्णांसाठी 'संजीवनी' ठरणाऱ्या गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. १०० खाटांचे हे रुग्णालय असून दररोज सुमारे ८०० रुग्णांची तपासणी केली जात आहे. रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने रुग्णालयात रुग्ण संख्येचा अक्षरशः 'स्फोट' झाला आहे, परंतु त्या तुलनेत आरोग्य सुविधा मात्र अत्यंत तोकड्या पडत असून रुग्णांना उपचारांऐवजी यातना सोसाव्या लागत आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नावे अधीक्षक चंद्रकांत खोत यांना निवेदन देण्यात आले. रुग्णालयाचे तात्काळ अद्ययावतीकरण करण्याची आणि रिक्त पदे भरण्याची जोरदार मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
आयसीयू आहे... पण आवश्यक डॉक्टर अन् कर्मचारीच नाहीत!
रुग्णालयात अतिदक्षता विभाग (ICU) उभारण्यात आला आहे; मात्र आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने हा आयसीयू असून अडचण अन् नसून खोळंबा अशा स्थितीत आहे. परिणामी गंभीर रुग्णांना वेळेत उपचार न मिळता ताटकळत राहावे लागत आहे किंवा खाजगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
सिटीस्कॅन : बाह्य रुग्णांकडून आकारले जाते ठराविक रक्कम
रुग्णालयातील सीटीस्कॅन यंत्रणा बाह्य यंत्रणेमार्फत (PPP मॉडेल) चालवली जाते. परंतु महाराष्ट्र शासनाकडून या यंत्रणेची थकीत बिले वेळेत न दिल्यामुळे काही काळ सीटीस्कॅन सेवा बंद ठेवण्यात आली होती, ज्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले. सध्या ही सेवा सुरू असली तरी ती केवळ आंतररुग्णांसाठी (IPD) मोफत असून बाह्यरुग्णांकडून (OPD) ठराविक रक्कम आकारली जात आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
खाटांची संख्या २०० करा आणि रिक्त पदे तत्काळ भरा!
गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, राधानगरी, भुदरगड आणि संकेश्वर भागातील वाढता ताण लक्षात घेता रुग्णालयाची क्षमता १०० वरून २०० खाटांची करण्यात यावी. तसेच रुग्णालयातील ताण कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरून सर्व सेवा गतिमान कराव्यात, अशी ठाम मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, मनविसे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, शहर अध्यक्ष केंपान्ना कोरी, गजाभाऊ सासणे, आण्णासाहेब देसाई, संतोष पाटील, अशोक करडे, युवराज लोखंडे, शिवराज कोणकेरी, वेदांत कुंभार, अथर्व दावणे, आर्यन जाधव, कल्लाप्पा धनगर, आर्यन चौगुले यांच्यासह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


