पश्चिम महाराष्ट्र संघटक उद्धव कदम यांची उपस्थिती
हे कार्यालय जनतेच्या न्यायाचे मुख्य केंद्र बनेल : तालुकाप्रमुख अजित खोत
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रचार-प्रसार आणि स्थानिक नागरिकांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी गडहिंग्लज तालुका संपर्क कार्यालयाचे आज अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक उद्धव कदम यांच्या शुभहस्ते फित कापून या कार्यालयाचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. 'उद्धव ठाकरे साहेब आगे बढो' अशा पक्षाच्या बुलंद घोषणांनी आणि भगव्या वातावरणाने संपूर्ण परिसर गजबजून गेला होता.
या संपर्क कार्यालयाच्या रुपाने तालुक्यातील शिवसैनिकांना हक्काचा निवारा मिळाला असून, गोरगरीब जनता व सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी एक भक्कम केंद्र उपलब्ध झाले आहे.
हे कार्यालय जनतेच्या न्यायाचे मुख्य केंद्र बनेल : तालुकाप्रमुख अजित खोत
कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात तालुकाप्रमुख अजित खोत यांनी संपर्क कार्यालयाची भूमिका विषद केली. ते म्हणाले, शिवसेना हा केवळ एक राजकीय पक्ष नसून अन्यायाविरुद्ध लढणारे आणि गोरगरिबांना न्याय देणारे एक सामाजिक विचारपीठ आहे. आज सुरू झालेले हे संपर्क कार्यालय केवळ राजकीय सभा किंवा बैठकांसाठी मर्यादित राहणार नाही, तर तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब जनता आणि महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी २४ तास उघडे राहील. तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिकाने आणि नागरिकाने आपल्या समस्या हक्काने या कार्यालयात मांडाव्यात. प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करून ते तडीस नेण्याची जबाबदारी आमची असेल. हे कार्यालय तालुक्यातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आणि जनतेच्या विश्वासाचे केंद्र ठरेल.
या सोहळ्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, महिला संपर्क संघटक रंजना शिंत्रे आणि शुभांगी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गडहिंग्लज तालुक्यातील संघटन अधिक मजबूत करण्याचा आणि तळागाळातील घटकांपर्यंत शिवसेनेची ताकद पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
उद्घाटन सोहळ्याला तालुक्यातील विविध विभागांचे प्रमुख, युवासेनेचे कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.


