पंधरा दिवस उलटूनही कारवाई न झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप
पिक पाहणी कामावरही बहिष्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): पन्हाळा तालुक्यातील कोतोली सजाचे महसूल सेवक (कोतवाल) कृष्णात बाबुराव पाटील यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ गडहिंग्लज तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने उद्या गुरुवार, दि. ०८ ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद व धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
पन्हाळा तहसील कार्यालयाअंतर्गत मौजे कोतोली सजा येथे कार्यरत असलेले महसूल सेवक (कोतवाल) कृष्णात बाबुराव पाटील यांच्यावर बुधवारी (दि. २३ सप्टेंबर रोजी) ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात असताना मारहाण झाली आहे.
या घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर रोजी) प्रशासनाला तातडीने निवेदन देऊन मारहाण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, घटना घडून तब्बल पंधरा दिवस उलटले तरीही संबंधितावर प्रशासनाकडून कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
पिक पाहणीवर बहिष्कार व बेमुदत आंदोलन
संबंधिताला तात्काळ अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांनी कालपासूनच शासनाच्या महत्त्वाच्या 'पिक पाहणी'च्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, मारहाण करणाऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत गुरुवार, दि. ०८ ऑक्टोबर पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व कोतवाल बांधव बेमुदत कामबंद आंदोलन व धरणे आंदोलन सुरू करणार आहेत.
यावेळी अध्यक्ष शंकर भोसले, पांडुरंग बरकाळे, विजय कांबळे, अल्लाबक्ष मकानदार, भिमा किल्लेदार, मिलिंद गुरव, अक्षय देसाई, कल्लापा नाईक उपस्थित होते.

