ऊस उत्पादकांना दिलासा; शिल्लक प्रतिटन ११९ रुपयांचा हप्ता २६ ऑक्टोबरला खात्यावर जमा होणार : आमदार डॉ. विनयरावजी कोरे
वारणानगर : श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शेतकरी, सभासद आणि कार्यकर्त्यांच्या उत्साही उपस्थितीत झाला. यंदाच्या हंगामात कारखाना पूर्ण तांत्रिक क्षमतेने चालवून १३ लाख मे. टनांहून अधिक उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. दरम्यान, सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील जाहीर ऊस दरानुसार प्रतिटन शिल्लक ११९ रुपयांचा हप्ता येत्या २६ ऑक्टोबर २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
मागील गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या उसाला प्रतिमेट्रिक टन ३,५४४ रुपये दर जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी प्रतिटन ३,५२५ रुपये यापूर्वीच शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. उर्वरित ११९ रुपये प्रतिटन हप्ता लवकरच जमा होणार असल्याने ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.
यंदाच्या हंगामाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व शेतकरी सभासदांनी सहकार्य करावे, तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला संपूर्ण ऊस वारणा कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन डॉ. कोरे यांनी केले. शेतकऱ्यांचा विश्वास आणि सहकार्याच्या बळावर यंदाचा हंगामही उच्चांकी गाळपाने यशस्वी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाच गटांतील शेतकऱ्यांच्या हस्ते धार्मिक विधी
गळीत हंगामाच्या शुभारंभानिमित्त कारखाना कार्यक्षेत्रातील पाच गटांमधील शेतकऱ्यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले. गट क्रमांक एकमधून मोहरे (ता. पन्हाळा) येथील जयप्रकाश जयसिंगराव जगदाळे, गट क्रमांक दोनमधून केखले (ता. पन्हाळा) येथील जगन्नाथ धोंडी पाटील, गट क्रमांक तीनमधून भेंडवडे (ता. हातकणंगले) येथील कुंडलिक वसंत कुंभार, गट क्रमांक चारमधून कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील कुमार पांडुरंग शेळके आणि गट क्रमांक पाचमधून करंजवडे (ता. वाळवा) येथील गणपतराव शामराव पाटील यांच्या हस्ते हे विधी करण्यात आले.
यावेळी प्रथम गाळपासाठी आलेल्या उसाचे तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे पूजन करण्यात आले. वाहनचालकांचा सत्कारही आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव, उपाध्यक्ष अॅड. एन. आर. पाटील, कारखान्याचे संचालक सुभाष पाटील, उदय पाटील, किशोर पाटील, विजय पाटील, सुभाष कणसे, सुभाष जाधव, संदीप जाधव, डॉ. प्रताप पाटील, श्रीनिवास डोईजड, विजय धनवडे, रवींद्र जाधव, काकासो चव्हाण, एन. एच. पाटील, सौ. रंजना पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक एस. आर. भगत, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, वारणा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी, सभासद, ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार, व्यापारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

