हलकर्णीत ११० विद्यार्थ्यांचे वाक्पटुत्वाचे सादरीकरण; राज्यभरातून लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमधील वक्तृत्वगुणांना वाव देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि वैचारिक जडणघडणीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'चंद्रकला करंडक २०२६' राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. श्रीमती चंद्राबाई कल्लापा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आणि हलकर्णी भाग हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत राज्यभरातून ११० स्पर्धकांनी आपल्या अमोघ वाक्पटुत्वाचे आणि वक्तृत्वकौशल्याचे सादरीकरण केले.
स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक डॉ. पी. डी. पाटील आणि उद्योजक मोहम्मद युसुफ मालदार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव नागेश मुंगरवाडी, संचालक डॉ. भोसकी, ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर म्हेत्री, सचिव प्रा. डॉ. अनिल शिर्के, खजिनदार रामलिंग दुध्यागोळ, हायस्कूलचे मुख्याध्यापक के. बी. पाटील, प्रा. डॉ. गावडे सर व स्वाती पोतदार मॅडम उपस्थित होत्या.
स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी ट्रस्टच्या सदस्या सौ. राजश्री शिर्के, सौ. विजया म्हेत्री, रोहित चिक्कबसर्गे, प्रशांत दास, कपिल म्हेत्री, सागर म्हेत्री आणि सतीश म्हेत्री यांनी विशेष परिश्रम घेतले.
परीक्षक म्हणून प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर, प्रा. निरंजन आरोंदेकर व प्रा. संपदा शिंदे यांनी काम पाहिले. तर वेळ नियंत्रक म्हणून प्राची मुंगुरवाडी, सुहास येणेचवंडी सर आणि सहाय्यक समन्वयक म्हणून सौ. स्वाती पोतदार व सोमनाथ खानापुरे सर यांनी जबाबदारी सांभाळली.
गट १ ला (इयत्ता ५ वी ते ८ वी - एकूण ७१ स्पर्धक) प्रथम क्रमांक आदिती अविनाश तराळ, द्वितीय क्रमांक अथर्व विठ्ठल गुरव, तृतीय क्रमांक श्रावणी महादेव डांगे, उत्तेजनार्थ प्राची अजित मोहिते
गट २ रा (इयत्ता ९ वी ते १२ वी - एकूण ३९ स्पर्धक) प्रथम क्रमांक दिया राणी दयानंद कोरवी, द्वितीय क्रमांक वेदांती धनाजी भोपळे-पाटील, तृतीय क्रमांक श्रावणी राजेंद्र आरवंदेकर, उत्तेजनार्थ प्रथम चार्वी रविंद्र कुंभार, उत्तेजनार्थ द्वितीय शौर्य शिवाजी ठोंबरे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विजयी स्पर्धकांना रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहक प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
सायंकाळी सात वाजता संपूर्ण स्पर्धेची सांगता झाली. हलकर्णी भाग हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संयोजन समितीच्या सहकार्याबद्दल तसेच स्पर्धक व पालकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल श्रीमती चंद्राबाई कल्लापा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.


