स्पर्धेला कोणताही कार्पोरेट पुरस्कर्ता नाही; गडहिंग्लजकर फुटबॉलप्रेमींच्या लोकवर्गणीवरच स्पर्धेची भिस्त
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत दिवाळीत होणाऱ्या अखिल भारतीय निंमत्रिताच्या खुल्या फुटबॉल स्पर्धेची तयारी सुरु झाली आहे. या स्पर्धा यशस्वी करणेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी लोकवर्गणीच्या संकलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. एम. आर. हायस्कूल मैदानावर १२ ते १८ नोव्हेंबर अखेर ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचे यंदाचे एकविसावे वर्ष आहे.
सत्तरच्या दशकात अजित क्रीडा मंडळाने या दिवाळीतील स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. सुरवातीला आंतरराज्य असणारे स्वरुप युनायटेडने गेल्या दोन दशकात अखिल भारतीय स्तरापर्यंत वाढविले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे. स्पर्धा यशस्वी करणेसाठी खेळाडूंच्या स्वागत, मैदान, भोजन, निवास, प्रवास, उदघाटन व बक्षिस वितरण, निधी संकलन, प्रसिध्दी, वैद्यकीय अशा समित्या करण्यात आल्या आहेत.
स्पर्धेतील सहभागी सर्व संघाना दोन्ही वेळेचा प्रवास खर्चासह निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाला रोख एक लाख, ७५ हजार, ३० हजार, २० हजार आणि सहा वैयक्तिक अशी एकुण सुमारे तीन लाख रुपयांची पारितोषिके आहेत. सुमारे पंधरा लाख रुपये स्पर्धेसाठी खर्च अपेक्षित आहे. मैदानाच्या स्वच्छतेचे काम सध्या सुरु आहे. त्यानंतर गवत कापणीसह दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले आहे. युनायटेडचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष जगदिश पट्टणशेट्टी, समन्वयक नितीन पाटील, सुरज कोंडूस्कर आणि सहकारी स्पर्धा यशस्वी करणेसाठी परिश्रम घेत आहेत.
महागाईचे आव्हान
या स्पर्धेला कोणताही कार्पोरेट पुरस्कर्ता नाही. साहजिकच केवळ गडहिंग्लजकर फुटबॉलप्रेमींच्या लोकवर्गणीवर स्पर्धेची भिस्त आहे. प्रवास, निवास आणि भोजनाच्या खर्चाच गेल्या २-४ वर्षात महागाईमुळे मोठी वाढ झाली आहे. या कारणामुळेच मोठ्या शहरात अश्या स्पर्धा बंद होत असताना या ठिकाणी मात्र युनायटेडच्या खेळाडूंनी चिकाटीने गडहिंग्लजकरांच्या मदतीने हि दिवाळीतील अर्धशतकाची परंपरा टिकवण्यासाठी धडपडत आहेत. मैदानाच्या दुरस्तीपासून पडले ते काम करून खेळाडू गडहिंग्लजची ओळख बनलेली या स्पर्धेच्या मदतीसाठी देणगीदरांना भेटून आवाहन करत आहेत.

