Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी धरणातील जॅकवेलची गळती रोखली; पाटबंधारेच्या टीमने पाणबुड्यांच्या साह्याने केली दुरुस्ती

पाणबुड्यांनी पाण्याच्या तळाशी उतरून शोधली गळती




गडहिंग्लज (प्रतिनिधी): पावसाची दडी आणि तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या जॅकवेलमधून होणाऱ्या पाणीगळतीमुळे ५ गावांतील शेतकरी व ग्रामस्थांवर ओढवलेल्या संकटावर 'डिजिटल गडहिंग्लज'ने प्रकाश टाकला होता. या वृत्ताची तात्काळ दखल घेत कोल्हापूर व गडहिंग्लज पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने तेरणी धरणाला भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे, धरणाच्या पाण्यात उतरून पाणबुड्यांमार्फत गळतीचे मुख्य ठिकाण शोधून ती तातडीने रोखण्यात आली आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे वाया जाणारे पाणी अडवण्यात यश आले असून परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी नितीन पाडले यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने हे काम पूर्ण केले.



तेरणी धरणातील जॅकवेलमधून गेली अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू होती. हे हक्काचे पाणी थेट वाहत शेजारील कर्नाटकाच्या हद्दीत जात होते. यंदा धरणात अवघा ८० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी उन्हाळ्यात तेरणी, बुगडीकट्टी, कळविकट्टे, हलकर्णी आणि चंदनकूड या ५ गावांवर पाणीटंचाईचे भीषण ढग घोंगावू लागले होते. सुमारे ८०० हेक्टर शेती आणि ३,५६० पशुधनाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार होता.




पंचायत समिती सदस्य स्वप्नील इंगवले व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर 'डिजिटल गडहिंग्लज' ने "तेरणी धरणाच्या जॅकवेलमधून पाणीगळती; पाणी कर्नाटकच्या हद्दीत!" या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. बातमी प्रसिद्ध होताच पाटबंधारे विभाग कोल्हापूर व गडहिंग्लज येथील यंत्रणा हलली.



पाणबुड्यांच्या साहाय्याने शोधले गळतीचे मूळ


वृत्ताची गांभीर्याने दखल घेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक शनिवारी तेरणी धरणावर दाखल झाले. जॅकवेलची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर गळतीचे नेमके स्थान शोधण्यासाठी विशेष पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले. पाणबुड्यांनी पाण्याच्या खोलीत उतरून ज्या ठिकाणी मुख्य गळती होती, त्या जागेचा शोध घेतला.


वर्षभरासाठी तात्पुरती दुरुस्ती; कायमस्वरूपी योजनेचे आश्वासन


गळतीचे ठिकाण स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत पाण्याच्या आतच आवश्यक त्या तात्पुरत्या स्वरूपात  उपाययोजना करून ही गळती थांबवली. सध्या या विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने ही दुरुस्ती सध्या आगामी एक वर्षाच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली असून, यामुळे सध्या वाया जाणारे लाखो लिटर पाणी रोखण्यात यश आले आहे. पाणीपातळी कमी झाल्यानंतर किंवा आगामी काळात या गळतीवर कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन पाहणीदरम्यान पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.



 स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांनी पाटबंधारे टीमला दिली माहिती 


यावेळी पंचायत समिती सदस्य स्वप्निल इंगवले, माजी सरपंच करवीर उथळे, संतोष इंगवले, रवींद्र इंगवले यांच्यासह गावातील विविध ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी गळती संदर्भात पाटबंधारे च्या टीमला माहिती दिली.


ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून समाधान 


"जॅकवेलच्या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी कर्नाटकात वाहून जात होते आणि आमची पिके वाळण्याची भीती होती. 'डिजिटल गडहिंग्लज'ने व पंचायत समिती सदस्य स्वप्नील इंगवले व इतर पदाधिकारी यांनी आमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला, त्यामुळेच ही तातडीची दुरुस्ती शक्य झाली," अशा भावना तेरणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.