इदरगुच्चीच्या सुपुत्राची मुंबईत यशस्वी भरारी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): इदरगुच्ची (ता. गडहिंग्लज) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवानंद इराप्पा काडाप्पनावर यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मुंबईतील नामांकित म्युच्युअल इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीत डेप्युटी मॅनेजरपदापर्यंत मजल मारली आहे. त्यांचे वडील शेती व्यवसाय करतात.
शालेय शिक्षणानंतर मुंबईत करिअरची वाटचाल सुरू करताना शिवानंद यांनी अनेक आव्हानांवर मात केली. मेहनत, कामाप्रती निष्ठा आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज डेप्युटी मॅनेजरपदापर्यंत घेतलेली झेप ग्रामीण भागातील तरुणांसाठी आत्मविश्वास आणि प्रेरणेचा स्रोत ठरत आहे.
व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि पदोन्नतीबद्दल शिवानंद काडाप्पनावर यांचे इदरगुच्ची व हलकर्णी परिसरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या यशस्वी वाटचालीचे सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे.

