साखरेचा हमीभाव वाढवा ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हुंकार
जोपर्यंत भाव वाढत नाही, तोपर्यंत धुराडे पेटू देणार नाहीचा निर्धार
सांगली : ऊसदर प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर थेट धडक दिली आहे. काल राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन स्थगित केल्यानंतर आता संघटनेने आपला मोर्चा आज थेट साखर कारखान्यांच्या वजन काट्यांकडे वळवला. दिवसभरात सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखान्यांवर 'काटा बंद' आंदोलन पुकारत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यांचे कामकाज पूर्णपणे बंद पाडले आहे.
आज सकाळपासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली आणि सातारा जिल्ह्यातील मातब्बर साखर कारखान्यांना लक्ष्य केले. यामध्ये कराडचा कृष्णा कारखाना, कुंडलचा क्रांती कारखाना, वांगीचा सोनहिरा कारखाना, वाळव्याचा हुतात्मा कारखाना, चिखलीचा विश्वास कारखानातसेच सर्वोदय कारखाना यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांच्या वजन काट्यांवर कार्यकर्त्यांनी धडक दिली.
जोपर्यंत हमीभाव नाही, तोपर्यंत धुराडे पेटू देणार नाही: राजू शेट्टी
या आंदोलनादरम्यान बोलताना नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, चालू वर्षी शेतकरी केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांविरोधात रस्त्यावरची आरपारची लढाई लढत आहे. साखरेचा हमीभाव वाढला, तर या लढाईत शेतकऱ्यांपेक्षा जास्त फायदा खुद्द कारखानदारांचाच होणार आहे. त्यामुळे सर्व कारखानदारांनी कोणत्याही राजकीय किंवा शासकीय दबावाला बळी न पडता या आंदोलनाला जाहीर सहकार्य करावे. जर कोणी कारखाने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, तर होणाऱ्या तीव्र नुकसानीची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वी कारखान्यांची असेल. जोपर्यंत केंद्र सरकार साखरेचा हमीभाव (MSP) वाढवत नाही, तोपर्यंत कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन आधीच सतर्क झाले होते. सर्वच साखर कारखान्यांच्या परिसरात सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, शेतकऱ्यांचा वाढता संताप आणि राजू शेट्टी यांच्या आक्रमक भूमिकेपुढे पोलिसांचा फौजफाटा असूनही कारखाने बंद पाडण्यात 'स्वाभिमानी'ला यश आले आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे केंद्र सरकार आता या शेतकरी आंदोलनापुढे नमते घेणार का आणि साखरेचा हमीभाव वाढवणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



