शिवाजी गुरव यांनी बांधली मनमोहक पूजा
आजरा ( प्रतिनिधी): आरदाळ (ता. आजरा) येथील प्रसिद्ध श्री भैरीदेव मंदिरामध्ये नवरात्रोत्सव निमित्ताने देवाची दररोज वेगवेगळ्या विलोभनीय रूपांत पूजा बांधली जात आहे. आज आरदाळ येथील भैरीदेव मंदिरात ‘पेंढारवाडीचा भैरीदेव व आरदाळचा भैरीदेव या दोन भावांची भेट’ अशा अत्यंत भक्तिमय व मनमोहक रूपातील पूजा बांधण्यात आली आहे. ही आकर्षक पूजा श्री भैरीदेवाचे पुजारी शिवाजी गुरव यांनी अतिशय आकर्षक पद्धतीने साकारली आहे.
पूजांचे वेगवेगळे प्रकार आणि परंपरा
आरदाळ येथील श्री भैरीदेव मंदिरात दरवर्षी विविध रूपांतील पूजा बांधण्याची मोठी परंपरा आहे. उत्सवाच्या पहिल्या दोन दिवशी देवांची साध्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती. त्यानंतर दिनांक १३ ऑक्टोबर रोजी देवाची 'घोड्यावर स्वार' झालेल्या रूपातील पूजा बांधण्यात आली, तर दिनांक १४ ऑक्टोबर रोजी देवाची 'रथावर स्वार व शस्त्रधारी' रूपातील पूजा साकारण्यात आली होती.
आज १५ ऑक्टोबर रोजी 'दोन भावांची भेट' या रूपातील पूजेने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यानंतरच्या पुढील टप्प्यात ‘देवांचा दरबार भरल्याच्या’ रूपातील भव्य पूजा बांधली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
शिलंगण दिवशी रंगतो अभूतपूर्व सोहळा
आरदाळ आणि पेंढारवाडी या दोन्ही गावांचे भैरीदेव हे भाऊ मानले जातात. त्यामुळे दरवर्षी शिलंगणाच्या (दसर्याच्या) दिवशी पेंढारवाडी गावाजवळ दोन्ही देवांच्या पालख्या एकत्रित येतात. या ऐतिहासिक व धार्मिक भेटीच्या प्रसंगी दोन्ही गावांतील हजारो ग्रामस्थ व भाविक सोने (आपट्याची पाने) लुटण्यासाठी आणि देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. 'श्री भैरीदेवाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. ही परंपरा कित्येक वर्षांपासून अविरतपणे सुरू असून भाविकांसाठी हा सोहळा अत्यंत श्रद्धा व उत्साहाचा असतो.

