Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यात अमृत जल योजनेच्या कामात बोजवारा; ठेकेदाराची देयके रोखण्यासाठी १३ नगरसेवक आक्रमक!

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत एक रुपयाही देऊ नका; सर्व नगरसेवकांशी चर्चा करूनच देयकांबाबत निर्णय घेण्याची ठाम मागणी




आजरा (प्रतिनिधी): आजरा शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे २७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी 'अमृत जल योजने'चे काम दोन वर्षे उलटूनही अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे राहिल्याने आजरा नगरपंचायतीमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वारंवार जळणाऱ्या मोटारी आणि विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना भयंकर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायतीच्या तब्बल १३ नगरसेवक आणि नगरसेविकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे धडक देऊन, पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत आणि सर्व नगरसेवकांशी सविस्तर चर्चा होईपर्यंत ठेकेदाराची उर्वरित देयके रोखण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.


तांत्रिक त्रुटी आणि अपुऱ्या मोटारींमुळे पाणीटंचाईची झळ


अमृत जल योजनेअंतर्गत नदीवरील पाणी उपसा केंद्रासाठी ५० एच.पी. क्षमतेच्या दोन मोटारी (एक मुख्य व एक स्टँडबाय) असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या शहराची पाण्याची वाढती गरज पाहता केवळ ५० एच.पी. मोटार पुरेशी ठरत नाही. वारंवार मोटारी नादुरुस्त होणे किंवा जळण्याच्या घटना घडत असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प होतो. भविष्यात अशी आणीबाणीची परिस्थिती उद्भवू नये यासाठी ५० एच.पी. व्यतिरिक्त आणखी एक ३० एच.पी. क्षमतेची अतिरिक्त स्टँडबाय मोटार उपलब्ध करून देण्याच्या सक्त सूचना ठेकेदाराला द्याव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.


प्रत्यक्ष पाहणी आणि तांत्रिक तपासणीशिवाय देयके अदा करू नका


नगरसेवकांनी निवेदनातून प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे दाखवून ठेकेदाराची बिले मंजूर करू नयेत. योजनेची प्रत्यक्ष कार्यक्षमता आणि कामाचा दर्जा तपासण्यासाठी खालील प्रमुख बाबींची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली आहे.


शहरातील प्रत्येक प्रभागात नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी पोहोचत आहे का, याची नगरपंचायतीने स्वतः पाहणी करून खात्री करावी, योजनेतील सर्व घटक आणि यंत्रसामग्री पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे की नाही, याची तज्ज्ञांमार्फत तांत्रिक तपासणी करण्यात यावी, सर्व प्रभागांतील नगरसेवकांशी कामाच्या गुणवत्तेबाबत चर्चा केल्याशिवाय अंतिम देयक अदा करू नये. असे निवेदनात म्हटले आहे. 


जनतेच्या पैशांचा अपव्यय थांबवण्याचे आवाहन


शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या योजनेचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आजरावासीयांना पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून तात्काळ कडक कारवाई करावी, अशी ठाम भूमिका नगरसेवकांनी मांडली.


ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात आणि नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी एकवटलेल्या नगरसेवकांमध्ये अभिषेक शिंपी, परशूराम बामणे, मुसासर्फराज पटेल, आसिफ सोनेखान, निसार लाडजी, डॉ. सौ. स्मिता कुंभार, श्रीमती कलावती कांबळे, सौ. अश्विनी चव्हाण, सौ. आसावरी खेडेकर, रहिमतबी खेडेकर, सौ. निशात चॉंद, श्री. विक्रम पटेकर आणि डॉ. इंद्रजीत देसाई यांचा समावेश आहे.


एकसाथ १३ नगरसेवकांनी दिलेल्या या इशारा पत्रामुळे आजरा नगरपंचायत वर्तुळात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, आता मुख्याधिकारी ठेकेदारावर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण आजरा शहराचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.