तलावही 'ओव्हर फ्लो' नाही अन् गळतीची कुऱ्हाड; तेरणी भागातील शेतकरी व ग्रामस्थ संकटात
गडहिंग्लज (संतोष नाईक): एकीकडे पावसाने मारलेली दडी आणि दुसरीकडे प्रशासनाचा अक्षम्य बेफिकीरपणा, या दुहेरी संकटात गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील तेरणी व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ सापडले आहेत. तेरणी येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या जॅकवेलमधून गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. हक्काचे पाणी थेट वाहत जाऊन शेजारील कर्नाटकात जात असताना पाटबंधारे विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. यंदा धरणात केवळ ८० टक्केच पाणीसाठा शिल्लक असताना होत असलेल्या या गळतीमुळे आगामी उन्हाळ्यात तेरणीसह परिसरातील ५ गावांवर भीषण पाणीटंचाईचे ढग घोंगावू लागले आहेत. दरम्यान, पंचायत समिती सदस्य स्वप्नील इंगवले, सरपंच रमेश पुजेरी त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आज पुन्हा जॅकवेलला भेट देऊन पाहणी केली. पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
३२ वर्षांत केवळ १२ वेळाच भरला तलाव!
गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व विभागाचा पिण्याचा आणि शेतीचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या विशेष प्रयत्नातून १२२ एफसीएमटी क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ काळात हा तलाव केवळ १२ वेळाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावात साचलेला गाळ 'ओलम शुगर', ग्रामपंचायत व लोकसहभागातून काढण्यात आला खरा; मात्र यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि अपुऱ्या पावसामुळे तलाव पूर्ण भरू शकलेला नाही.
८०० हेक्टर शेती आणि ३५६० पशुधन धोक्यात
या तलावातील पाण्यावर तेरणी, बुगडीकट्टी, कळविकट्टे, हलकर्णी आणि चंदनकूड या ५ गावांची पिण्याच्या पाण्याची व शेतीची मदार आहे. तेरणीतील सुमारे ८०० हेक्टर पिकाऊ शेती आणि ३५६० हून अधिक पशुधनासाठी आणि पाच हजार लोकांची तहान भगवणारा हा एकमेव मुख्य आधार आहे. खरीप हंगाम हातातून गेला असून आता रब्बीची पिके कशी घ्यायची आणि आगामी १० महिने शेती व पिण्यासाठी हे पाणी कसे पुरवायचे, या विवंचनेत शेतकरी आहेत.
शासनाकडून केवळ 'वाटाण्याच्या अक्षता'!
तलावाच्या पुनर्भरणाचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर आला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला, परंतु शासनाने व संबंधित विभागाने नेहमीच वाटाण्याच्या अक्षता लावल्या. निसर्गाचा लहरीपणा, भाजीपाल्यावरील रोगराई आणि बाजारातील दराची अनिश्चितता यामुळे शेतकरी आधीच आर्थिक डबघाईस आला आहे. त्यातच परतीचा पाऊस लांबल्यास परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे. जॅकवेलची कायमस्वरूपी दुरुस्ती होण्यास वेळ लागणार असला, तरी सध्या वाया जाणारे हे मौल्यवान पाणी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीने तात्पुरत्या उपाययोजना करून पाणी अडवावे. जर प्रशासनाने तातडीने जॅकवेलची गळती थांबवली नाही, तर उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल हे मात्र निश्चित.
पंचायत समिती सदस्य स्वप्नील इंगवले यांच्याकडून पाहणी
पंचायत समिती सदस्य स्वप्निल इंगवले यांनी आज सरपंच रमेश पुजेरी यांच्यासह जॅकवेल गळतीच्या ठिकाणी पाहणी केली. पाण्याची गळती वेगाने होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर पाणी हे कर्नाटक हद्दीत जात आहे. याबाबत त्यांनी घटनास्थळावरूनच संबंधित विभागाला याची पुन्हा कल्पना दिली आहे. गेले किती वर्ष या ठिकाणी गळती असून देखील संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तरी देखील वरिष्ठ पातळीवरून याबाबत आजच लेखी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


