![]() |
| कोल्हापूर: खासदार शाहू छत्रपती यांना पाणी प्रश्नी निवेदन देताना बाळकृष्ण रावण, एस बी पाटील, एम.ए.शिंदे, सुनील लोहार, तानाजी नार्वेकर , शिवगोंडा पाटील. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामविकास , पर्यावरण संवर्धन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात कार्यरत असलेल्या नांगनूर (ता. गडहिंग्लज ) येथील सहयोग फाउंडेशनच्या वतीने खासदार शाहू छत्रपती यांना जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की शेजारील कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी आणि संकेश्वर शहराचे सांडपाणी हिरण्यकेशी नदीपत्रात थेट मिसळ असल्यामुळे पाणी प्रदूषित होत आहे. कालपरत्वे गावाला पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना झाल्या. शासनाचे लाखो रुपये खर्च झाले मात्र गावाला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळत नाही हे येथील वास्तव आहे. सध्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी विहिरी, कुपनलिका यांचाच आधार घ्यावा लागत आहे. ग्रामस्थांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्प राबवावा.
यावेळी खासदार शाहू छत्रपती यांनी पिण्याच्या पाणी प्रश्नावर शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जस्मिन यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून नांगनूर गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्यामुळे प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी फाउंडेशनचे सदस्य एस बी पाटील, बाळकृष्ण रावण, एम.ए शिंदे, सुनील लोहार ,तानाजी नार्वेकर ,शिवगोंडा पाटील उपस्थित होते.

