पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघणार विसर्जन मिरवणूक
पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद, ६ नवरात्र मंडळांचे सहकार्य
आजरा (हसन तकीलदार): आगामी शारदीय नवरात्रोत्सव शांततेत, सुरळीत, विधायक उपक्रमांनी आणि ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात साजरा व्हावा, यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला आजरा शहरातील सर्व प्रमुख नवरात्रोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवर आजरा शहरातील सर्व मंडळांनी यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव 'डॉल्बीमुक्त' आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा करण्याचा एकमुखी व स्तुत्य निर्णय जाहीर केला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी (गडहिंग्लज) विवेक पाटील व आजरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
आजरा पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी बाबासाहेब सरवदे यांनी बोलविलेल्या विशेष बैठकीमध्ये मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पोलीस प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार दिनांक २० ऑक्टोबर रोजी होणारी नवरात्रोत्सवाची विसर्जन मिरवणूक कोणतीही डॉल्बी वा सिस्टिम न वापरता, पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि वेळेत पार पाडण्याचा संकल्प मंडळांनी जाहीर पत्राद्वारे केला आहे.
'डॉल्बीमुक्त' उपक्रमात सहभागी झालेली प्रमुख मंडळे
धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळ, गांधीनगर, क्रांतीकारी नवरात्र उत्सव मंडळ, चाफेगल्ली, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, द लायन्स किंग नवरात्र उत्सव मंडळ, भगवा रक्षक तरुण मंडळ, छत्रपती शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळ.
पोलीस प्रशासनाच्या विधायक आवाहनाला मान देऊन पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी आणि नागरिक, बालके व वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मंडळांनी घेतलेल्या या निर्णयाचे आजरा शहरातून व परिसरातून विशेष कौतुक होत आहे. सर्व मंडळांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभारही मानण्यात आले आहेत.


