Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शशिकांत खोत ठरले ‘जायंट किलर’; नवीद मुश्रीफ यांना धक्का!

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय रणनीतीची कसोटी ; ओबीसी गटातील निकालाने कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ




कोल्हापूर : इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटातील निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी धक्कादायक विजय मिळवत ‘जायंट किलर’ ठरण्याचा मान मिळवला. त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ यांचा पराभव केला. या निकालामुळे मुश्रीफ गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या पराभवाची चर्चा सुरू झाली आहे.


निवडणुकीची घोषणा झाली, तेव्हा नवीद मुश्रीफ हे सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यांनी या गटातून उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, जागावाटपातील तडजोडीनंतर त्यांना ओबीसी गटातून निवडणूक लढवावी लागली. या गटात त्यांच्याविरोधात कोण उमेदवार असेल, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.


शशिकांत खोत यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवीद यांच्यासाठी ही लढत सोपी ठरेल, अशी चर्चा रंगली होती. हसन मुश्रीफ हे महायुतीच्या पॅनेलचे प्रमुख नेते असल्याने आणि पॅनेलच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने नवीद यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, प्रत्यक्ष निकालाने या अंदाजांना छेद दिला.



हसन मुश्रीफ यांनी मागील सहा विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या राजकीय कौशल्याच्या जोरावर यश मिळवले होते. मात्र, नवीद यांना या निवडणुकीत अपेक्षित रणनीती आखता आली नाही, असे निकालावरून दिसून आले. पद मिळविण्याच्या अपेक्षेबरोबरच नवीद यांच्याबाबत निर्माण झालेली नाराजीही त्यांच्या विरोधात गेल्याची चर्चा आहे.


मुश्रीफ यांच्या राजकीय प्रभावाला आव्हान?


नवीद मुश्रीफ यांचा पराभव हा केवळ एका उमेदवाराचा पराभव नसून, स्थानिक राजकारणातील बदलत्या जनमताचे संकेत देणारा ठरला आहे. शशिकांत खोत यांनी मिळवलेल्या या विजयामुळे त्यांचे राजकीय वजन वाढले आहे. दुसरीकडे, या निकालातून हसन मुश्रीफ कोणता राजकीय धडा घेतात आणि आगामी काळात आपली रणनीती कशी आखतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.