महाडिक गटाला मोठा फटका, अंजना रेडेकर यांची बाजी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत महिला राखीव गटातून भाजपच्या प्रदेश नेत्या आणि माजी संचालिका शौमिका महाडिक यांचा झालेला पराभव हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. नवख्या भाग्यश्री डोंगळे यांनी त्यांचा पराभव करत राजकीय वर्तुळाला धक्का दिला. महायुतीची सत्ता आली असती, तर आगामी काळात संभाव्य अध्यक्षपदासाठी शौमिका महाडिक यांच्या नावाची चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र, निवडणुकीतील पराभवामुळे या शक्यतांना ब्रेक लागला आहे.
गोकुळच्या निकालादरम्यान दिवसभर शौमिका महाडिक यांच्या विजय-पराभवाबाबत सर्वाधिक उत्सुकता होती. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सुमारे तीन दशके गोकुळच्या राजकारणावर प्रभाव राखला होता. अशा परिस्थितीत त्यांच्या कन्येचा पराभव हा महाडिक गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
अंजना रेडेकर यांचा मतदारांशी संपर्क ठरला महत्त्वाचा
महिला राखीव गटातून समविचारी आघाडीच्या अंजना रेडेकर या जागा राखतील, असा अंदाज सुरुवातीपासून व्यक्त होत होता. मागील निवडणुकीत त्यांनी चांगली मते मिळवली होती. दूध संस्थांशी असलेला त्यांचा वैयक्तिक संपर्क आणि वादांपासून दूर राहून काम करण्याची भूमिका मतदारांना भावल्याचे मानले जाते.
दुसरीकडे, शौमिका महाडिक यांचा विजयही निश्चित मानला जात होता. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष, मंत्री हसन मुश्रीफ व नवीद मुश्रीफ यांच्यावर त्यांनी केलेले आरोप आणि यापूर्वी अपात्र ठरविण्यात आलेल्या; नंतर न्यायालयाने पात्र ठरविलेल्या १,४४० मतांबाबतची नाराजी, या मुद्द्यांचा त्यांच्या निकालावर परिणाम झाल्याची चर्चा आहे. परिणामी, अपेक्षित पाठिंबा मिळवण्यात त्यांना अपयश आले.
दिनकरराव जाधव, बजरंग देसाई यांच्या वारसांना यश
गोकुळच्या निवडणुकीत तालुकानिहाय मतांचे गणितही महत्त्वाचे ठरले. भुदरगड तालुक्यातून माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र विश्वजित जाधव यांना मतदारांनी विजयी केले. अनेक तालुक्यांमध्ये मतदारांनी आपल्या तालुक्यातील उमेदवारांना प्राधान्य दिल्यानंतर उर्वरित मते पॅनेलच्या उमेदवारांना दिल्याचे चित्र दिसून आले. या स्थानिक समीकरणांचा निकालावर प्रभाव पडला.
माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र राहुल देसाई यांनीही विजय मिळवला. या विजयामुळे आमदार सतेज पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही राजकीय पायाभरणी केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बाबासाहेब देवकर यांना आंदोलनांचा फायदा
गोकुळच्या मागील निवडणुकीत ‘गोकुळ बचाव’ संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढविणारे बाबासाहेब देवकर यांना त्या वेळी ऐनवेळी झालेल्या आघाडीमुळे उमेदवारीपासून दूर राहावे लागले होते. मात्र, यावेळी त्यांनी विजय मिळवत संचालकपदापर्यंत मजल मारली.
सामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका, ऊस आंदोलन, इरिगेशन फेडरेशनचा लढा आणि शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलनातील सक्रिय सहभाग यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. त्यांच्या विजयासाठी जयंत पाटील यांनी दहा दिवस तळ ठोकून प्रचाराची जबाबदारी सांभाळली आणि आवश्यक मदत पुरवली. या प्रयत्नांचाही देवकर यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जाते.
निकालाने बदलली गोकुळच्या राजकारणाची दिशा
शौमिका महाडिक यांचा पराभव, भाग्यश्री डोंगळे यांचा विजय, अंजना रेडेकर यांचे यश आणि विश्वजित जाधव, राहुल देसाई व बाबासाहेब देवकर यांची निवड या घडामोडींनी गोकुळच्या राजकारणातील बदल अधोरेखित केला आहे. या निकालातून स्थानिक संपर्क, मतदारांची नाराजी, तालुकानिहाय समीकरणे आणि प्रचारातील संघटनशक्ती यांचे महत्त्व पुन्हा स्पष्ट झाले आहे. आगामी काळात या निकालाचे जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणावर काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

