Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेतील खर्च मर्यादेत सुधारणा

रस्त्यांच्या प्रकारानुसार अनुदानाची मर्यादा निश्चित




मुंबई : राज्यातील शेत-पाणंद रस्त्यांची कामे अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी तसेच मनरेगा आणि राज्य रोजगार हमी योजनेच्या अभिसरणातून उपलब्ध निधी चांगल्या रीतीने वापरण्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेतील खर्चाच्या मर्यादांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.


 

राज्यातील शेत-पाणंद रस्त्यांच्या कामात दिरंगाई होऊ नये. तसेच मजुरांची उपलब्धता, कुशल कामांची गरज ओळखून या योजनेमध्ये काही बदल करणे आवश्यक होते. त्यानुसार मंत्रिमंडळाने योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतला. रस्त्याचे मजबुतीकरण, अतिक्रमण काढून कच्चा-पक्का रस्ता एकत्रीकरण करणे आणि रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता करणे अशा तीन कामांसाठी खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यानुसार मुरुमीकरण आणि आवश्यकतेनुसार खडीकरण करून मजबुतीकरण करण्यासाठी दर किलोमीटरमागे १३ लाख रुपयांचे पूरक कुशल अनुदान देण्यात येईल. या कामांसाठी दर किलोमीटरमागे किमान ३ लाख रुपये अकुशल मजुरीवर खर्च करणे आवश्यक असून, त्याच्या दोन तृतीयांश म्हणजे २ लाख रुपयांचा कुशल खर्च मनरेगांतर्गत देण्यात येईल.


 

शेत-पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून मातीकाम, कच्चा रस्ता तयार करणे, मुरुमीकरण आणि खडीकरण अशी एकत्रित कामे करण्यासाठी राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत दर किलोमीटरमागे कमाल १५ लाख रुपयांचे पूरक कुशल अनुदान देण्यात येईल. यामध्ये अतिक्रमण काढून मातीकाम व कच्चा रस्ता तयार करण्यासाठी कमाल २ लाख रुपये, तर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी कमाल १३ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या प्रकारच्या कामांसाठीही मनरेगांतर्गत दर किलोमीटरमागे किमान ३ लाख रुपये अकुशल खर्च आणि त्याच्या दोन तृतीयांश म्हणजे २ लाख रुपयांचा कुशल खर्च देण्यात येईल.


 

अतिक्रमणमुक्त करून केवळ कच्चा शेत-पाणंद रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम यंत्रसामुग्रीचा वापर तसेच पाणी टाकून रोडरोलरद्वारे दबाई करण्यासाठी राज्य रोजगार हमी योजनेतून दर किलोमीटरमागे कमाल २ लाख रुपयांचे पूरक कुशल अनुदान देण्यात येईल. या कामांमध्ये यंत्रांच्या वापरासाठी यापूर्वी निश्चित केलेल्या तासांच्या मर्यादा आणि त्यापेक्षा अधिक वापरासाठी तालुकास्तरीय समितीची मान्यता घेण्याची तरतूद कायम राहील.


 

वृक्षलागवड आणि जलसंधारणाच्या कामांनाही प्रोत्साहन :- शेत-पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा मनरेगांतर्गत वृक्षलागवड करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चर खोदल्यामुळे शेतजमिनींचे बांध नष्ट झालेल्या पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर मनरेगांतर्गत वैयक्तिक किंवा सामुदायिक स्वरूपातील मृदसंधारण, जलसंधारण आणि बांधबंदिस्तीची कामे घेता येतील.


 

स्थानिक परिस्थितीनुसार रस्त्यांचे बांधकाम:- महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान आणि रस्त्यांवरील वाहतुकीचा भार यांमध्ये जिल्हानिहाय विविधता असल्याने संपूर्ण राज्यासाठी एकसमान तांत्रिक मापदंड लागू करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे इंडियन रोड काँग्रेसच्या ग्रामीण रस्ते संहितेतील मानकांनुसार तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामविकास विभागाने विहित केलेले मापदंड विचारात घेऊन बारमाही वापरयोग्य शेत-पाणंद रस्ते तयार करण्यात येतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.