तेरणीतील मराठी विद्या मंदिर शाळेत 'शैक्षणिक ग्रामसभा व पालक मेळावा' उत्साहात
मोबाईलचा अतिरेक टाळण्यासह वृक्षसंवर्धनाचे संस्कार रुजवण्याचे आवाहन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुलांनी शिकावे, मोठे व्हावे आणि उच्चशिक्षित व्हावे, हा ध्यास जर पालकांनी मनात धरला तर ते नक्कीच साध्य होते. मात्र, यासाठी सर्व काही केवळ शिक्षकांवर न सोडता पालकांनीही आपल्या घरात स्वतः शिक्षक बनून मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन कौलगे येथील माजी मुख्याध्यापक राजाराम पोवार यांनी केले.
तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील मराठी विद्या मंदिर शाळेत आयोजित शैक्षणिक ग्रामसभा आणि पालक मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
व्यवहारातून आणि हसत-खेळत द्या गणिताचे ज्ञान
आपल्या मार्गदर्शनात पुढे बोलताना राजाराम पोवार म्हणाले की, सध्याच्या काळात शासनाकडून विविध अशैक्षणिक कामे दिली जात असल्याने पूर्वीप्रमाणे शिक्षकांना अध्यापनासाठी जास्त वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे पालकांनी घरामध्ये मुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पहिली व दुसरीतील मुलांना जवळ बसवून घरातील वस्तू मोजायला सांगून व्यवहारातून गणिताचे ज्ञान द्यावे. यामुळे हसत-खेळत आणि सोप्या पद्धतीने मुले हे ज्ञान आत्मसात करतील. तसेच सध्या वाढत्या मोबाईलच्या अतिरेक वापरामुळे मुलांवर वाईट परिणाम होत असून, पालकांनी मोबाईलचा वापर नियंत्रित करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
शिक्षकांनी शाळेव्यतिरिक्त अतिरिक्त वेळ द्यावा
शिक्षकांनी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी किती अतिरिक्त वेळ दिला यावरून त्या शाळेची गुणवत्ता ठरते. विद्यार्थ्यांच्या चौफेर विकासासाठी शिक्षकांनी वेगळा वेळ दिलाच पाहिजे असे सांगून त्यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे, याचा सखोल विचार करून अध्यापन केल्यास पुढील पिढीचे भविष्य उज्ज्वल होईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच पालकांनी मुलांमध्ये वृक्षसंवर्धनाचे संस्कार आणि मूल्ये रुजवावीत, असे आवाहनही श्री. पोवार यांनी केले. यावेळी त्यांनी अध्यापन करत असताना त्यांना आलेले विविध अनुभव, त्यांनी राबविलेले विविध उपक्रम याविषयी माहिती दिली. विविध कथांमधून त्यांनी पालकांना मुलांवर कोणते संस्कार रुजवावेत याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात शिक्षक रमजान अंकली यांनी शैक्षणिक ग्रामसभेचा मुख्य हेतू स्पष्ट केला. केंद्रप्रमुख मल्लिकार्जुन यादगुडी व सौ. ज्योती नंद्यापगोळ यांनीही विद्यार्थ्यांना घडवताना शिक्षकांसोबतच पालकांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे, यावर मार्गदर्शन करत मुले घरी असताना पालकांनी काय काळजी घ्यावी याचे आवाहन केले. या प्रसंगी राजाराम पोवार यांनी शाळेला पुस्तके भेट स्वरूपात दिली.
या पालक मेळाव्याला संजय जोशी, मल्लाप्पा इंगवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील तेगनाळे, सौ. नीता गोरे, ग्रामपंचायत अधिकारी दीपक कांबळे, शंकर निंबाळकर, मुख्याध्यापक इस्माईल कादरभाई यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कल्लोळे यांनी केले तर आभार शिक्षक संभाजी पाटील यांनी मानले.








